विराट कोहली टी20 वर्ल्ड कप 2024 च्या ग्रुप स्टेजमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. मात्र, सुपर 8 च्या मॅचेस वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. विराट सध्या जोरदार सराव करत आहे. विराट कोहलीकडून जोरदार नेट प्रॅक्टीस सुरु आहे. पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी विराट कोहली प्रयत्न करतोय. भारत सुपर 8 च्या ग्रुप-1 मध्ये आहे. भारत आणि अफगाणिस्तान मॅच 20 जून म्हणजे उद्या होणार आहे. या मॅचमध्ये विराट कोहलीला एक रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
विराट कोहलीला ग्रुप स्टेजमधील तीन मॅचेसमध्ये 5 धावा करता आल्या आहेत. आता विराट कोहली सुपर 8 मध्ये कमबॅक करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. अफगाणिस्तान विरुद्ध कोहलीला फॉर्म गवसण आवश्यक आहे. ग्रुप स्टेजमधील खराब कामगिरी विसरुन विराट कोहलीनं अफगाणिस्तान विरुद्ध 8 चौकार मारल्यास तो टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरेल. विराट कोहलीनं ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान विरुद्ध केवळ एक चौकार मारला होता.
महेला जयवर्धनेचा रेकॉर्ड मोडणार?
श्रीलंकाचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज आहेत. जयवर्धने यांनी 111 चौकार मारले आहेत. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीनं आतापर्यंत 104 चौकार मारले आहेत. आता विराटनं आणखी 8 चौकार मारल्यास तो पहिल्या स्थानावर येईल.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.कोहलीनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 30 सामन्यात 28 डावात 67.41 च्या सरासरीनं 130.52 च्या स्ट्राइक रेटनं 1146 धावा केल्या आहेत. विराटनं 14 अर्धशतकं केली असून 89 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. कोहलीनं 104 चौकारांसह 28 षटकार मारले आहेत.
आकाश चोप्रानं विराट कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. विराट कोहलीनं यापूर्वीच्या तीन मॅचमध्ये आक्रमक फलंदाजी केलेली आहे. विराट कोहलीनं खेळपट्टीवर स्वत:ला थोडा वेळ दिल्यास त्याला सूर गवसेल, असं आकाश चोप्रानं म्हटलं आहे. वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्या अमेरिकेच्या तुलनेत चांगल्या आहेत. अमेरिकेत गोलंदाजांना फायदा मिळत होता. वेस्ट इंडिजमध्ये फलंदाजांना फायदा मिळू शकतो, असं आकाश चोप्रानं म्हटलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात यशस्वी होते का ते पाहावं लागणार आहे.