सोलापूर – सोलापूर ते मुंबई असा सुमारे २० दिवसांचा पायी प्रवास करणाऱ्या २५ हजार कष्टकरी महिला व पुरुषांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भव्य पायी लॉन्ग मार्चदरम्यान सहभागी श्रमिकांना कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण निर्माण होऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेने विशेष आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)च्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील श्रमिक व कष्टकरी जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पायी लॉन्ग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पार्क चौक येथून या मार्चला सुरुवात होणार असून, सोलापूर ते मुंबई असा हा प्रवास असणार आहे. या आंदोलनात सुमारे २५ हजार महिला व पुरुष कामगार सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सुमारे २० दिवस चालणाऱ्या या दीर्घ पदयात्रेत हजारो कष्टकरी महिला व पुरुष सहभागी होणार असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सलग पायी चालल्यामुळे थकवा, निर्जलीकरण, उष्माघात, रक्तदाबातील बदल, पायांना होणाऱ्या दुखापती तसेच अन्य वैद्यकीय समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ कामगार आणि आधीपासून आरोग्यविषयक समस्या असलेल्या सहभागींच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज असणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लॉन्ग मार्चच्या नियोजनानुसार आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करावीत. तसेच ॲम्बुलन्सची व्यवस्था, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून द्यावा. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी समन्वय यंत्रणाही कार्यान्वित करावी, अशी मागणी आडम यांनी केली आहे.
आंदोलनाचा उद्देश शासनापर्यंत कष्टकऱ्यांचे प्रश्न पोहोचविण्याचा असला, तरी या प्रवासात सहभागी होणाऱ्या हजारो श्रमिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन पदयात्रा सुरू होण्यापूर्वीच ठोस आरोग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोट
सोलापूर ते मुंबई जाणाऱ्या पंचवीस हजार कष्टकऱ्यांच्या पायीलोंग मार्चला सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी लेखी स्वरूपात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले आहे