
सोलापूर – लिटिल चॅम्प १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत चंदू खाडिलकर संघाने ३ गडी राखून बाजी मारली.
जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर झालेल्या सामन्यात चंदू खाडिलकर इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. चंदू पवार इलेव्हनचा डाव २९.१ षटकांत अवघ्या १०५ धावांवर आटोपला. पवार इलेव्हनकडून चिराग आणि सुरज मोरे यांनी प्रत्येकी २६ धावांची खेळी करत संघाला शंभरी पार करून दिली. अवनीक लकडे आणि निहाल साका यांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले.
चंदू खाडिलकर इलेव्हनच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. श्रीतिका देशमुख, सोमेश लोखंडे, आरव शहा आणि मीत गुडगुंटी यांनी प्रत्येकी २ बळी घेत विरोधी संघाला खिंडार पाडले, तर मल्हार आणि साईविराज देशेटी यांनी प्रत्येकी १ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.
१०६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चंदू खाडिलकर इलेव्हनची सुरुवातही सोपी नव्हती. चंदू पवार इलेव्हनच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत सामन्यात रंगत आणली. शिवम कोगनुरे, निहाल साका, अवनीक लकडे आणि स्वरूप पवार यांनी प्रत्येकी १ बळी घेत खाडिलकर इलेव्हनच्या ६ फलंदाजांना तंबूत पाठवले होते.
सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे, जेव्हा संघ अडचणीत होता, तेव्हा मीत गुडगुंटीने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने नाबाद ३६ धावांची झुंजार खेळी करत सामना चंदू पवार इलेव्हनच्या हातातून हिसकावून घेतला. त्याला हर्षवर्धन काळे (१४ धावा) आणि साईविराज देशेटी (१२ धावा) यांची मोलाची साथ लाभली. अखेर २४ व्या षटकात चंदू खाडिलकर इलेव्हनने ६ बाद १०७ धावा करत सामना ३ विकेट्सने आपल्या नावावर केला.
गोलंदाजीत २ महत्त्वाचे बळी आणि फलंदाजीत नाबाद ३६ धावांची मॅच-विनिंग खेळी करणाऱ्या मीत गुडगुंटीला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. पंच म्हणून चंदू मंजिली आणि अशोक डोंबावळे यांनी काम पाहिले. प्रथमेश देगावकर यांनी गुणलेखन केले.


















