चेन्नई, 24 जून (हिं.स.) : श्रीलंकेत तुरुंगात डांबलेल्या मच्छिमारांच्या सुटकेसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्रमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. श्रीलंकेने 22 मच्छिमारांना तुरुंगात डांबले असून त्यांच्या 4 बोटीही जप्त केल्या आहेत. त्यांची सुटका करा अशी मागणी स्टॅलिन यांनी केलीय.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सोमवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, श्रीलंकेकडून ‘अटक आणि धमकावण्याच्या घटनांमुळे’ मच्छिमारांच्या जीविताचे नुकसान होत आहे. एकूण 22 भारतीय मच्छिमारांना त्यांच्या तीन यांत्रिक मासेमारी नौकांसह श्रीलंकेने 22 जून रोजी मासेमारी बंदरातून अटक केली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सर्व मच्छिमारांची आणि त्यांच्या बोटींची सुटका करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी स्टॅलिन यांनी केली. तसेच या मच्छिमारांची आणि त्यांच्या बोटींची तात्काळ सुटका करण्याची विनंती स्टॅलिन यांनी केली.
तसेच, तामिळनाडूच्या विविध मच्छिमार संघटनांनी श्रीलंकेतील तुरुंगात असलेल्या मच्छिमारांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी आणि काही मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्याच्या विनंतीचा सक्रियपणे विचार केला जाऊ शकतो. या समस्येसाठी स्थापन केलेल्या संयुक्त कार्यगटाचे ‘पुनरुज्जीवन’ करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. तसेच श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांसह या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी विनंती देखील स्टॅलिन यांनी केलीय.