सोलापूर : शहरातील विस्तारित पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्यात नागरिकांच्या सूचना व हरकतींचा समावेश करण्यात येणार असून त्यानंतरच सविस्तर प्रकल्प अहवाल जागतिक बँकेकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)चे नोडल अधिकारी रमेश पेटकर यांनी पत्रकारांना दिली. जागतिक बँकेची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर महानगरपालिकेने १३७८ कोटी रुपयांच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेला यापूर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के निधी जागतिक बँकेकडून कर्जस्वरूपात उपलब्ध होणार असून २५ टक्के निधी राज्य शासन आणि उर्वरित २५ टक्के निधी महापालिकेकडून उभारला जाणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील चार महत्त्वाच्या महापालिकांमध्ये सोलापूरचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी नागरिकांच्या सहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शहरातील आठही झोन कार्यालयांमध्ये नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. या बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि हरकतींचा अंतिम आराखड्यात विचार करण्यात येणार असल्याचे पेटकर यांनी सांगितले.वाढती लोकसंख्या, सातत्याने वाढणारी पाण्याची मागणी आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी लक्षात घेऊन ही महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. सध्या उजनी धरण आणि भीमा नदी प्रणालीवर अवलंबून असलेल्या शहराला वितरणातील गळती, जुन्या जलवाहिन्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रकल्पांतर्गत नवीन जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण, नवीन जलसाठा टाक्यांची उभारणी तसेच गळती नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी कमी होऊन नागरिकांना अधिक नियमित, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा योजनेबाबत झालेल्या बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे रमेश पेटकर यांनी सांगितले. लोकांना दररोज सुरळीत पाणीपुरवठा हवा आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे सहकार्य मिळत आहे. जलवाहिन्या टाकताना काही अडचणी येतील, मात्र त्यावर समन्वयातून मार्ग काढला जाईल. पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे पेटकर यांनी स्पष्ट केले.
शहराची जलसुरक्षा अधिक
मजबूत होणार : नरेंद्र काळे
महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले की, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सोलापूरकरांना दाबासह नियमित पाणीपुरवठा मिळेल. भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराची जलसुरक्षा अधिक मजबूत होणार असून आधुनिक जलव्यवस्थापनामुळे पर्यावरणीय शाश्वततेलाही हातभार लागेल.
Post Views: 36