माढा : नगरपंचायतच्या विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेअंतर्गत विकास कामासाठी २ कोटी ६२ लाख रुपये निधी मंजूर झाला असून
अग्निशामक कक्ष व अग्निशामक गाडीसाठी १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर असून लवकरच माढा नगरपंचायतसाठी अग्निशामक गाडी मिळणार असल्याचे माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ॲड मिनल साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.येत्या दोन तीन दिवसात माढा जाधववाडी रोड लगत असलेल्या कचरा डेपो येथे अग्निशामक कक्षाचे उद्घाटन नगरपंचायतच्या वतीने करण्यात येणार असल्याचे ॲड साठे यांनी सांगितले आहे. माढा शहराच्या विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या निधीतून माढा शहरातील ग्रामदैवत श्री माढेश्वरी मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या मातंगाई मंदिर सुशोभीकरण व संरक्षण भिंत तसेच प्रभाग क्रमांक १३ व १० येथील सभामंडप सुशोभीकरण प्रभाग क्रमांक ४ व ५ म्हसोबा पार सभामंडप तसेच शहरातील इनलाईन गटार, पेवर ब्लॉक, स्ट्रीट लाईट, रस्ते व इतर विकास कामे या निधीतून केली जाणार आहेत.त्याचबरोबर १ कोटी रुपये अग्निशामक कक्ष इमारत व ९०लाख रुपये अग्निशामक गाडीसाठी वापरण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
माढा नगरपंचायतीकडून वरील निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला असला तरी हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार बबनराव शिंदे व माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे नगराध्यक्षा साठे म्हणाल्या आहेत.
त्याच बरोबर राज्य शासनाच्या धोरणानुसार नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी इमारती व त्याचे देखभाल ह्या नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात असल्याने शहरातील नवीन अंगणवाडी इमारत व देखभालीसाठी आम्ही प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.
माढा नगरपंचायतीच्या विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून २ कोटी ६१ लाख व अग्निशामक कक्ष व अग्निशामक गाडीसाठी १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याने आम्हाला मोठे समाधान आहे. हा निधी मंजुरीसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे व बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे मोठा सहकार्य यात लाभले असून त्यांच्या सहकार्यामुळेच हा निधी माढा नगरपंचायतीस मिळाला आहे. त्यामुळे आम्ही नगरपंचायतीच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. पुढील काळात देखील ते असेच मदत करतील ही अपेक्षा करते.
– ॲड.मिनल ताई साठे, नगराध्यक्षा माढा.

















