करमाळा – करमाळा शहर व बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात करमाळा पोलिसांना मोठे यश आले आहे. बसस्थानकातून तब्बल ६ तोळे ७ ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवणारी भामटी महिला आणि शहरातून दुचाकी चोरणारा सराईत चोरटा अशा दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पहिली घटना: गर्दीचा फायदा घेऊन ६ तोळे सोने लांबवणारी महिला जेरबंद अंकोली (जि. सोलापूर) येथील स्वाती धनंजय पुजारी या महिला ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी करमाळा बसस्थानकावरून सोलापूरकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. एसटी बसमध्ये चढताना अज्ञात चोराने त्यांच्या हँडपर्सची साखळी उघडून आत ठेवलेला २५ ग्रॅमचा राणी हार, २७ ग्रॅमचे मोठे घंटन, १० ग्रॅमचा चोकर आणि ५ ग्रॅमचे झुबे टॉप असा एकूण १० लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास चक्र वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण, बातमीदार आणि बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे साधना जैण्या काळे (वय २७, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) ही महिला संशयित निष्पन्न झाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, तिने घरातील पेटीत लपवून ठेवलेले सर्व सोन्याचे दागिने काढून दिले. पोलिसांनी तिच्याकडून १० लाख ५ हजार रुपयांचा संपूर्ण ऐवज जप्त करून तिला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/१६८२ मोहळकर करत आहेत.
दुसरी घटना: पुलाखाली लपवलेली चोरीची दुचाकी हस्तगत दुसऱ्या घटनेत, ४ ऑगस्ट २०२६ रोजी कसाब गल्ली येथून ओंकार सुभाष मारडकर यांची ६५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटर सायकल (MH 16 Z 9940) चोरीला गेली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदाराच्या आधारे रावसाहेब उर्फ पप्पु पांडुरंग चव्हाण (रा. सावडी, ता. करमाळा) याला ताब्यात घेतले. त्याने चोरी केलेली दुचाकी सावडी गावातील पुलाखाली लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी जप्त करून आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास पोकॉ/५९५ ईसामिया बहीरे करत आहेत.
पोलीस पथकाचे कौतुक ही कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोहेकॉ अभिजीत मोहळकर, पोना वैभव ठेंगल, पोकॉ ईसामिया बहीरे, पोकॉ रविराज गटकुळ, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ अमोल रंदिव, पोकॉ योगेश येवले आणि पोकॉ गणेश शिंदे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.




















