वैराग – बार्शी तालुक्यातील प्रमुख केंद्र असलेल्या वैराग शहराच्या आणि परिसरातील ६१ गावांतील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन प्रमुख मागण्यांबाबत आज मुंबई मंत्रालयात महत्त्वपूर्ण घडामोडी पार पडल्या. मा. आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांनी मंत्रालयात आरोग्यमंत्री व महसूलमंत्री यांची भेट घेऊन वैरागच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले.
१. ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी ‘विशेष बाब’ म्हणून निधी मिळणार
वैराग येथील मंजूर झालेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसह अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी ‘विशेष बाब’ म्हणून तातडीने निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी अमरराजे निंबाळकर यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्याकडे केली.
वैराग येथील गट नंबर ४२२/२ मधील २ हेक्टर ४५ आर एवढी जागा आरोग्य विभागाच्या नावे हस्तांतरित (७/१२ व ८-अ उतारा) झाली आहे. सध्या आरोग्य सुविधांसाठी वैराग परिसरातील ७० ते ८० हजार नागरिकांना बार्शी किंवा सोलापूर येथे जावे लागते, ज्यामुळे गरीब रुग्णांचे आर्थिक व मानसिक हाल होतात. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सदर कामासाठी ‘विशेष बाब’ म्हणून निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन दिले.
२. वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय मंजुरीचा मार्ग सुकर
वैराग व परिसरातील ६१ गावांतील नागरिकांना महसूल कामांसाठी दूर अंतरावर असलेल्या बार्शी तहसील कार्यालयात वारंवार जावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातो. ही अडचण लक्षात घेऊन वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळावी, या मागणीसाठी अमरराजे निंबाळकर यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वैरागच्या वाढत्या लोकसंख्येची व भौगोलिक परिस्थितीची गरज लक्षात घेता, लवकरच वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात येईल असे आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
आमदार दिलीपरावजी सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली अमरराजे निंबाळकर यांनी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे वैराग व परिसरातील ६१ गावांच्या जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
Post Views: 10