बार्शी – सुयश विद्यालय, बार्शी येथे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ११८ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करुन त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा आदर्श उपक्रम शाळेच्यावतीने राबविण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून विधान परिषदेचे आमदार राजेंद्रजी राऊत, प्रशांत कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मीरा-भाईंदरचे प्रसाद नलावडे, कौरव आप्पा माने, अनिल बनसोडे, शामसुंदर गवळी, संतोष सूर्यवंशी
तसेच संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलवडे व सचिव सौ. प्रियंका नलवडे यांचीही कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली.
सुयश विद्यालयातील इयत्ता पाचवीचे ५८ व इयत्ता आठवीचे ६० असे एकूण ११८ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा विशेष गौरव
इयत्ता पाचवी व आठवीतील राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रुपये ५,००१, सन्मानचिन्ह, शाल व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचे हे कौतुक त्यांच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
शिक्षकांचाही विशेष सन्मान
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचीही यावेळी दखल घेण्यात आली. शिष्यवृत्ती वर्गांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना बक्षिसाची रक्कम, मानाचा फेटा व शेला देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शिवदास नलवडे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतात श्री. राजेंद्र राऊत यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी व जिद्दीचे कौतुक करत त्यांनी सुयश विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचेही विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सुचविले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप, उपमुख्याध्यापक संदीप येवले सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ. साखरे मॅडम यांनी केले.
Post Views: 3