सोलापूर : शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम सोलापूर महानगरपालिकेने अधिक तीव्र केली असून दुसऱ्या दिवशी गुरुवार पेठ आणि शनिवार पेठ परिसरात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बोगस बांधकाम परवान्याशी संबंधित ९६ प्रकरणांतील कारवाई मोहिमेअंतर्गत गुरुवारी एकूण ११ अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्यात आले.
महापालिकेच्या नगररचना विभागाकडून १९ ते २३ मेदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवार पेठ येथील ताहेर बागवान तसेच शनिवार पेठेतील खुदाबक्ष बागवान यांच्या इमारतींमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या तपासणीत संबंधित इमारतींमधील पार्किंगसाठी राखीव जागेवर व्यावसायिक गाळे उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार पार्किंग क्षेत्राचा व्यावसायिक वापर करता येत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळपासूनच महापालिकेचे पथक आवश्यक यंत्रसामग्रीसह घटनास्थळी दाखल झाले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जेलरोड पोलीस स्टेशनच्या पथकासह पोलीस निरीक्षक राऊत यांनी विशेष सहकार्य केले.या कारवाईत कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, उपअभियंता आनंद जोशी, सहाय्यक अभियंता शकील शेख, इर्शाद झरतार, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे, बसवराज बडगा, सलमान मणियार, दयानंद अवताडे, दिपाली मेटकरी, प्रमोद गोविंदवार तसेच अतिक्रमण विभागाचे दीपक कुंभार व अन्य अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शहरातील अवैध बांधकामांवर यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई सुरूच राहणार, असा इशारा महापालिकेच्या नगररचना विभागाने दिला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.
Post Views: 6