बार्शी – तालुका ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या हातभट्टी दारुची वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ७५० लिटर हातभट्टी दारूसह टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल मोतीराम बोंदर यांना पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने यांच्यामार्फत गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, मौजे बावी ते बार्शी रोडवरुन एका अशोक लिलँड कंपनीच्या टेम्पोमधून हातभट्टी दारुची वाहतूक केली जात आहे.
या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बार्शी-शेलगाव मार्गावरील फपाळवाडी शिवारातील दर्शना मिल समोरील गतिरोधकाजवळ सापळा रचून वाहनांची तपासणी सुरु केली. दरम्यान, संशयित राखाडी रंगाचा अशोक लिलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक MH 13 DQ 4813 आला असता पोलिसांनी त्यास थांबवून चौकशी केली.
सुरुवातीला चालकाने वाहनात शेतीमाल असल्याचे सांगितले. मात्र वाहनाची पाहणी केली असता टेम्पोच्या हौद्यात काळ्या रंगाच्या रबरी ट्युबामध्ये हातभट्टी दारुचा आंबट व उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पंचांना बोलावून पंचासमक्ष तपासणी करण्यात आली असता टेम्पोमध्ये प्रत्येकी ५० लिटर क्षमतेच्या एकूण १५ रबरी ट्युबा मिळून आल्या. यामध्ये एकूण ७५० लिटर हातभट्टी दारु आढळून आली.
पोलिसांनी ७५ हजार रुपये किमतीची हातभट्टी दारच तसेच ३ लाख रुपये किमतीचा अशोक लिलँड कंपनीचा टेम्पो असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चालकाने त्याचे नाव अविनाश प्रकाश पवार (वय २७, रा. तांबेवाडी यमाई तांडा, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे सांगितले. पोलिसांनी पंचनामा करुन मुद्देमाल जप्त केला असून नमुना तपासणीसाठी दारुचे सॅम्पलही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपी अविनाश पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ) व ६५ (ई) अन्वये बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहेत.
सदरची धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई बालाजी वळसने, पोहेकॉ राजेंद्र मंगरुळे, पोहेकॉ केकाण, पोकॉ राहुल बोंदर, चालक पोकों खराडे तसेच मदतीला आलेले पोहेकॉ डी खांडेकर आणि पोकों बागल यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
Post Views: 7