
सोलापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली “लाडकी बहीण योजना” तात्कलिन उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी जून 2024 मध्ये घोषणा करून त्याची अंमलबजावणी केली. या योजनेचे सर्व श्रेय स्व. अजितदादानाच जाते. त्यामुळे या योजनेस “स्व. अजितदादा पवार लाडकी बहीण योजना” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी “वर्ल्ड ऑफ वुमन” या संस्थेच्या वतीने राज्यातील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना केली. लेखी निवेदनाद्वारे संस्थेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखालील महिला शिष्टमंडळाने ही मागणी केली.
या योजनेमुळे राज्यात पुन्हा सत्ता प्राप्त करण्यात सुलभता झाली. ही योजना गेम चेंजर ठरली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो गरीब महिलांना आर्थिक आधार लाभला आहे. राज्यभरातील लाखो महिला-भगिनी स्व. अजितदादा ना आशीर्वाद, दुवा देत आहेत. त्यामुळे या योजनेस “स्व. अजित दादा पवार लाडकी बहीण योजना” असे नामकरण करणे हीच अजितदादा ना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेलं, असेही सर्व महिलांनी सुनेत्रा ताई ना सांगितलं. याप्रसंगी सुनेत्रा पवार फार भावुक झाल्या. आपली मागणी रास्त आहे परंतु हा धोरणत्मक निर्णय असून मा मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी सर्व उपस्थित महिलांना दिले.
संजय गांधी निराधार योजनामार्फत दरमहा रुपये १५००/- च दिले जातात ते सुद्धा वेळेवर दिले जात नाहीत. ही रक्कम सध्याच्या महागाईत फारच तुटपुंजी आहे. या योजनेंतील महिलांना इतर कोणतेही आर्थिक साधन नसते, “कुटुंब कर्त्या”चा आधार नसतो त्यामुळे महिलांना दरमहा रु. 3000/- प्रमाणे मानधन वाढवून देण्यात यावे अशी मागणी WOW च्या महिलांनी लावून धरली. या मागणीचा गांभीर्याने विचार करून अशा महिलांना न्याय देण्याची आपली सकारात्मक भूमिका राहील असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
या वेळी मनीषा नलावडे, सायरा शेख, कांचन चौगुले, लक्ष्मी माने, शोभा गायकवाड, पुष्पा हलकुडे, स्वाती मुकणार, मारता असादे, शबाना शेख, शारदा मसूती, प्रिया कुलकर्णी, वंदना चंदनशिवे, सारिका लामतुरे आदी उपस्थित होते.






















