सोलापूर – शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी आणि खासगीकरणाच्या संकटांशी झुंज देणाऱ्या देशातील युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने दिला. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांविषयी कथितरीत्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढण्यात आला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “होय, आम्ही झुरळ!” असे उपरोधिक संदेश असलेली जॅकेट परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले.
युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम म्हणाले, “हा केवळ शब्दांचा प्रश्न नसून देशातील तरुणांच्या स्वाभिमानावर घाव आहे. युवक म्हणजे देशाची ऊर्जा, श्रम आणि भविष्य आहे. शेतात राबणारा शेतकरी, कारखान्यात काम करणारा कामगार, स्पर्धा परीक्षांसाठी संघर्ष करणारा विद्यार्थी आणि बेरोजगारीशी झुंज देणारा पदवीधर हा देशाचा खरा शिल्पकार आहे.”
राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनीही सरकारवर टीका करताना युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. “देशातील युवक भीक मागत नाहीत; ते त्यांच्या हक्काची मागणी करत आहेत. अन्यायाविरोधात लढण्याची ताकद युवकांमध्येच आहे,” असे ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनासोबत प्रतीकात्मक झुरळाची प्रतिमाही देण्यात आली. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारताचे सरन्यायाधीश यांना पाठविण्यात आले. यावेळी बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, अश्विनी मामाड्याल, नरेश गुल्लापल्ली, अभिजित निकंबे, दिनेश बडगु, चंटी बिटला, राधागोपाल बंडी आदी उपस्थित होते.
Post Views: 20