सोलापूर : स्व. हरिश्चंद्र फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २०२६-२७ या वर्षासाठीचे प्रतिष्ठेचे ‘राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. कला, शिक्षण, साहित्य, समाजसेवा, कृषी, सहकार, उद्योग, पत्रकारिता आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यभरातील ६२ मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव कृष्णा गायकवाड यांनी दिली.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये पत्रकार भरतकुमार मोरे, डॉ. अनिता अमोल चौधरी, सुरेश वाघमारे, भागवत पांढरे, बॉस्को डिसुझा, रामचंद्र वारगड यांच्यासह नऊ जणांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील २१ मान्यवरांना शिक्षणरत्न, तर ११ जणांना कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय आठ जणांना प्रेरणाज्योती, सात जणांना समाजदर्पण आणि दोघांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.
विशेष पुरस्कारांमध्ये साहित्यदर्पण, कृषीरत्न, वृत्तदर्पण, आदर्श प्रशासक, उद्योगरत्न आणि सहकाररत्न पुरस्कारांचा समावेश आहे.
‘संघर्षातून उत्कर्षाकडे’ हा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या फाउंडेशनच्या वतीने या पुरस्कारांचे आयोजन केले जाते. पुरस्कार वितरण सोहळा २० डिसेंबर रोजी सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
Views: 9