बार्शी – बार्शी शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व २१ प्रभागांमध्ये तातडीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आमदार दिलीप सोपल यांनी पत्राद्वारे केली आहे. या सोबतच संपूर्ण शहरासाठी प्रभागनिहाय पाणीपुरवठा कृती आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना निवेदन पाठविले आहे. बार्शी शहरातील अनेक भागांत नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. केवळ काही ठराविक भागांत टँकर सुरु करुन पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार नसून सर्व २१ प्रभागांतील
लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन समान पाणीवाटप होणे आवश्यक असल्याचे आ. सोपल यांनी म्हटले आहे. प्रत्येक प्रभागासाठी टँकरची संख्या, पाण्याच्या फेऱ्या, वितरणाची ठिकाणे आणि वेळापत्रक निश्चित करावे. तसेच पाणीपुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन स्वतंत्र तक्रार निवारण व्यवस्था उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व टँकरना जीपीएस यंत्रणा बसवून त्यांच्या फेऱ्या, ठिकाणे व वेळेवर नियंत्रण ठेवावे, जेणेकरुन पाणी वितरणात पारदर्शकता राहील व गैरप्रकारांना आळा बसेल, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. पाणीटंचाई पूर्णपणे संपेपर्यंत टँकर व्यवस्था सुरु ठेवावी, त्यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता द्यावी आणि संबंधित विभागांची तातडीने समन्वय बैठक घेऊन कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार सोपल यांनी केली आहे.
Views: 9