सोलापूर – सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून “खेलेगा भारत, जितेगा भारत” चा फज्जा! असे वृत्त शनिवारी दैनिक ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर येथील क्रीडा संघटकातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
संपूर्ण भारत देशात २९ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून अत्यंत उत्साहात पाळला जातो. मात्र, सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे यंदा राष्ट्रीय क्रीडा दिनाचा पुरंदा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. याबाबत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते हाजीमलंग नदाफ व बास्केटबॉलचे ज्येष्ठ प्रशिक्षक राजेंद्र नारायणकर तसेच बॉक्सिंगचे प्रशिक्षक आप्पासाहेब चिंचकर म्हणतात, सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक क्रीडा संघटना आणि राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सक्रिय कार्य करत असताना, यंदा प्रथमच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रीय क्रीडा दिन साजराच करण्यात आला नाही. पूर्वी जिल्ह्यातील सर्व शिवछत्रपती पुरस्कार विजेते, जिल्हा पुरस्कार विजेते आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्या संयुक्त विचाराने कार्यक्रमाचे नियोजन केले जात असे. तसेच, त्या त्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व खेळाडूंचा एकत्र सत्कार समारंभ याच कार्यालयात पार पडत असे. या कार्यक्रमास विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहत असत. परंतु, सध्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये परिपूर्ण अधिकारी व कर्मचारी असतानाही राष्ट्रीय क्रीडा दिनी एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित न राहिल्याने क्रीडा वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कार्यालयातील या अनास्था व गैरहजेरीमुळे क्रीडा संघटक, अनेक राष्ट्रीय खेळाडू, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने होणाऱ्या उपक्रमांपासून वंचित राहावे लागले. कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी, दोन तालुका क्रीडा अधिकारी, दोन क्रीडा अधिकारी, लिपिक, शिपाई आणि असा संपूर्ण फौजफाटा असतानाही कार्यालयीन कामकाजात झालेली ही कसूर गंभीर स्वरूपाची आहे. याची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे
——–
क्रीडा उपसंचालकाची गंभीर दखल; काटेकोर निर्देश जारी
याप्रकरणी पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांना पत्र पाठवून कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत, कार्यक्षमतेबाबत आणि शिस्तीबाबत कडक निर्देश दिले आहेत. अचानक तपासणीदरम्यान अनधिकृत अनुपस्थिती किंवा दिरंगाई आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. यापुढे कार्यालयीन कामकाज किंवा कर्तव्य बजावण्यात कोणतीही अनियमितता आढळल्यास केवळ संबंधित कर्मचारीच नव्हे, तर कार्यालय प्रमुख म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी यांचीही कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच या घटनेचा खुलासाही मागविणार असल्याचे त्यांनी दैनिक ‘तरुण भारत’ला सांगितले.




















