नवी दिल्ली, २ जुलै, (हिं. स) काँग्रेसचे जेव्हा 400 खासदार होते तेव्हा केंद्र सरकारमध्ये केलेल्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारावर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत सडकून टीका केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर शिवसेना पक्षाकडून खासदार डॉ. शिंदे यांनी अभिनंदन केले. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. शिंदे यांनी काँग्रेसचा दुटप्पीपणाचा बुरखा फाडला.
ते म्हणाले की जेव्हा काँग्रेसचे संख्याबळ 400 वर होते तेव्हा केंद्र सरकारने 1984 मध्ये शाहबानो या गरिब मुस्लिम महिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अधिकार रद्द केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक रद्द करुन मुस्लिम महिलांना न्याय दिला. या देशात राष्ट्रपती यांना अपमानित करण्याचे काम काँग्रसने केले. बोफोर्स घोटाळा करुन लष्कराला कमजोर करण्याचे काम याच काँग्रेसने केले. भोपाळ गॅस दुर्घटनेतील आरोपी वॉरेन अॅंडरसन याला चार्टर्ड विमानाने देशाबाहेर पलायन करण्यास काँग्रेसने मदत केली अशी घणाघाती टीका डॉ. शिंदे यांनी केली.
डॉ. शिंदे म्हणाले की, काँग्रेसने आजपर्यंत संविधानावर फेक नॅरेटिव्हने राजकारण केले. संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनवेळा निवडणुकीत पराभूत करण्याचे काम नेहरु यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने केले, अशी टीका डॉ. शिंदे यांनी केली. ते म्हणाले की, आमच्या सरकारने संविधान दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराचे स्मारक आणि मुंबईतील इंदू मिलमधील भवदिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढवला आहे. ते पुढे म्हणाले की, एम. एस गिल यांनी निवडणूक आयुक्त असताना बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी रद्द केला होता. त्याच एम. एस गिल यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले आणि पुढे त्यांना क्रीडा मंत्री केले होते, असे सांगत डॉ. शिंदे यांनी काँग्रेसचा खोटेपणा समोर आणला.
ते म्हणाले की शिवसेना एनडीएमधील सर्वात जुना मित्र पक्ष आहे. एलआयसीच्या बोधवाक्याप्रमाणे जिंदगी साथ भी जिंदगी के बाद भी अशी शिवसेना भाजप युती आहे. अर्थात बाळासाहेब असताना आणि बाळासाहेबांनंतर देखील शिवसेना भाजप युती अभेद्य असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. विजयाबद्दल डॉ. शिंदे यांनी महाराष्ट्र आणि कल्याणच्या जनतेला धन्यवाद दिले. एनडीए सरकारकडून येत्या पाच वर्षात चांगली धोरणे लागू केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. शिंदे म्हणाले की या निवडणुकीत लोकांनी एक संदेश दिलाय तो म्हणजे काँग्रेस एकट्याने लढली किंवा इंडि आघाडी म्हणून लढली तरी काँग्रेसला विरोधी बाकांवरच बसायचे आहे. राहुल गांधींची जागा विरोधी पक्षात आहे, असा टोला डॉ. शिंदे यांनी लगावला. दहा वर्षात काँग्रेस केवळ 44 जागांवरुन 99 जागांपर्यंत वाढली. त्यांना 100 आकडा देखील गाठता आला नाही. ते पुढे म्हणाले की, आकडेवारीचा विचार केला तर काँग्रेसने निवडणुकीत 285 जागांवर निवडणूक लढवली आणि केवळ 99 जागा जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट केवळ 34% इतका आहे. त्यांच्या 51 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल, जम्मू कश्मिर, मध्य प्रदेश, दिल्ली आणि त्रिपुरा या राज्यात काँग्रेसला खाते सुद्धा खोलता आले नाही. काँग्रेसने वेगवेगळ्या राज्यात 336 उमेदवार उभे केले होते त्यातील फक्त 15 जिंकून आले. हे प्रमाण 5% पेक्षा कमी आहे. मात्र काँग्रेसचे आकडे कमी असले तरी यावेळी अक्कल वाढली आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.
डॉ. शिंदे म्हणाले की, लोकशाही सगळ्यात मोठा उत्सव शांततेत पूर्ण झाला ही आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगभरातील 80 देशांत निवडणुका होणार असून त्यातील 55 देशांत निवडणुका झाल्या आणि 37 देशांत सरकार बदलले मात्र भारतीयांनी एनडीए सरकारवर विश्वास दाखवला. 75 वर्षातील एक मजबूत देश म्हणून भारताने मागील 10 वर्षात प्रगती केली आहे. भारत कोणावरही अवलंबून नाही. काँग्रेसच्या परराष्ट्र धोरणामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा पोखरली होती. त्यामुळे 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे आपल्याला उत्तर नाही देता आले. मात्र आमच्या सरकारने अंतर्गत सुरक्षा मजबूत केली आहे. जी 20 देशांमधील शक्तीशाली देशांच्या प्रमुखांशी चर्चा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची ताकद वाढवली असे डॉ. शिंदे म्हणाले.
अग्निवीर योजनेवर टीका करणाऱ्या काँग्रसेला डॉ.श्रीकांत शिंदे यांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले की मुंबईत 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावेळी काँग्रेसचे सरकार होते. तेव्हाचे गृहमंत्री कपडे बदलत होते. आमच्या पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्रे नव्हती. बुलेटप्रुफ जॅकेट नव्हती. त्यामुळे काँग्रेसला अंतर्गत सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. मात्र मागील 10 वर्षात देशातील कोणत्याही मोठ्या शहरात दहशतवादी हल्ला झाला नाही. भारतावर वाकड्या नजरेने बघण्याची शेजारीत देशांची हिंमत नाही,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरतात, असे ते म्हणाले.
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघात शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्या विजयावर आक्षेप घेऊन वृत्तपत्राची खोटी बातमी ट्विट केल्याबद्दल विरोधी पक्षनेते माफी मागणार का असा सवाल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला.
महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारने दोन वर्षात समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, बुलेट ट्रेन, मराठवाडा रेल कोच फॅक्ट्री यासारख्या बड्या प्रकल्पांना रेकॉर्ड वेळेत पूर्ण करण्याचे काम केंद्र सरकारच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने केले आहे. महाराष्ट्रात आर्थिक विकास पाहणी अहवालाने विरोधकांच्या थोबाडात मारली आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्राचा विकास दर 9.4% इतका आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते आज संसदेत उपस्थित नाहीत कारण ते पळपुटे आहेत, अशी खरमरीत टीका डॉ. शिंदे यांनी उबाठा गटावर केली. हिंदू हिंसक है असे बोलणाऱ्या विरोधी पक्ष नेत्या राहुल गांधी यांनाही डॉ. शिंदे यांनी खडे बोल सुनावले. हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती तलवार घेतली होती. त्यांनी ते धाडस दाखवले नसते तर आज अटक ते कटक हिंदवी स्वराज्य आले नसते, असे त्यांनी सांगितले.
*एनडीएच्या 10 वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला*
डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की 2014 पूर्व भारतात 7 एम्स आणि 390 मेडिकल कॉलेज होते. आज 16 नवीन एम्स आणि 315 नवीन मेडिकल कॉलेज सुरु झाले आहेत. जम्मू काश्मिमध्ये नवीन एम्सचे काम सुरु असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. 10 वर्षात भारत 11 क्रमांकावरुन 5 क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. स्टार्टअप्स 1 लाखांहून अधिक असून 2014 पूर्वी देशात केवळ 300 स्टार्टअप होते.
*पांडुरंगाच्या जयघोषाने डॉ. शिंदे यांनी केली भाषणाची सुरुवात*
संसदेतील पहिले भाषण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पांडुरंगाच्या जयघोषाने सुरु केले. ते म्हणाले की आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा आषाढी वारी सोहळा सुरु आहे. लाखो वारकरी पायी दिंडीतून चालत पंढरपूर जाऊन पांडुंरंगाचे दर्शन करतात. त्याच पांडुंरंगाच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात करतो असे सांगत त्यांनी पुंडलीकवरदा हारी विठ्ठलचा गजर केला आणि इतर खासदारांनी या जयघोषाला साथ दिली.