बार्शी – शहरातील वाहतूक पोलीस शाखा समोरील वसुंधरा हॉटेल परिसरात स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेली सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन दत्तात्रय नलवडे (वय ४३, व्यवसाय – किराणा व्यापारी, सध्या रा. ढगे मळा, बार्शी) यांचे मार्केट यार्ड, तुळजापूर रोड येथे किराणा दुकान आहे. व्यवसायासाठी घेतलेले १० लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी स्वतःचे, पत्नीचे व मुलांचे सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज काढण्याचा निर्णय घेतला होता.
त्यासाठी गुरुवार दि. ११ जून रोजी दुपारी ते सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन बारामती सहकारी बँकेच्या बार्शी शाखेत गेले होते. मात्र तारण कर्जाचे काम पूर्ण न झाल्याने त्यांनी सोन्याचे मूल्यांकन करण्यासाठी सराफ दुकानात भेट दिली. तेथून परतल्यानंतर सर्व दागिने व रोख रक्कम असलेली बॅग स्कुटीच्या डिकीत ठेवून ते आपल्या दुकानात गेले.
रात्री ८.३७ वाजता घरी जात असताना वसुंधरा हॉटेलजवळ ते पापडी खरेदी करण्यासाठी थांबले. यावेळी त्यांनी स्कुटी चुकून चावीसह उभी करुन दुकानात प्रवेश केला. काही वेळाने परत आल्यानंतर डिकी उघडून पाहिली असता त्यामधील बॅग गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या बॅगेमध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याचा हार, गंठण, कानातील फुले, ब्रेसलेट, गोफ, चेन, अंगठ्या यासह एकूण १५ तोळे सोन्याचे दागिने तसेच दुकानातील आणि वैयक्तिक मिळून सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांची रोकड होती. १५ तोळे सोने व रोख रक्कम ४ लाख ८० हजार असा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
घटनेनंतर धक्का बसल्यामुळे तक्रारदाराची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तत्काळ तक्रार दाखल न करता उपचार घेतल्यानंतर शुक्रवार दि. १२ जून रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु आहे. चोरीस गेलेला ऐवज आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.