सोलापूर : शहरातील वाढत्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी हद्दवाढ भागात नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासह धोकादायक वीजतारा हटविणे, भूमिगत केबल टाकणे, स्ट्रीट लाईटसाठी सर्व्हिस वायर उपलब्ध करून देणे आणि शहरातील विविध प्रलंबित वीजविषयक प्रश्नांवर शुक्रवारी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीता केळकर प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी महापौरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.बैठकीत हद्दवाढ भागातील वीज वितरण अधिक सक्षम करण्यासाठी नवीन सबस्टेशन उभारण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी आवश्यक मोकळी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका आणि महावितरण यांच्यात समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली. शहरातील अनेक ठिकाणी घरांलगत गेलेल्या किंवा धोकादायक अवस्थेतील वीजतारा तातडीने हटविणे, आवश्यक ठिकाणी भूमिगत केबल टाकणे, नवीन केबल टर्मिनेशन करणे आणि स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक विद्युत जोडण्या उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.
याशिवाय प्रमुख मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर, स्मशानभूमींमधील वीज सुविधांचे बळकटीकरण, पंपिंग स्टेशनला अखंडित वीजपुरवठा तसेच शहरातील एलईडी पथदिव्यांच्या वीजपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.
अमृत योजनेअंतर्गत देसाईनगर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण झाल्यानंतर तो सुरू करण्यासाठी आवश्यक ११ केव्ही वीजवाहिनी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी नीताताई केळकर यांनी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन घरांवर रूफटॉप सोलर प्रणाली बसवावी, सौरऊर्जेचा वापर वाढवावा तसेच वीज वापर अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी स्मार्ट मीटरचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.
महापौर विनायक कोंड्याल यांनी शहरातील वीजपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका आणि महावितरणने समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता विनायक इदायते, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, नगरसेवक बिजू प्रधाने, सत्यनारायण गुर्रम, रवी कयावले, भीमाशंकर केंगनाळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांच्यासह महापालिका व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
Post Views: 6