सोलापूर – वाढते वायू प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचा संदेश देत जिल्हा परिषद सोलापूरने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेमध्ये दर सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी केली आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी खाजगी दुचाकी, चारचाकी तसेच शासकीय वाहनांचा वापर टाळायचा आहे. त्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस, सायकल, इलेक्ट्रिक वाहन किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या युध्दजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाचा काटकसरीने वापर करणे आवश्यक बनले आहे. त्याचबरोबर वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचेही जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान,जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ इंधन बचतीपुरता मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा असल्याचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद सोलापूरने हा निर्णय घेतल्याने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही या उपक्रमाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमामुळे इंधन बचतीसोबतच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचणार आहे. त्यामुळे “देशहितासाठी छोटंसं योगदान देऊया” असा संदेश देत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष दिपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी केले आहे.


























