सोलापूर – तालुक्यातील वांगी येथे सालाबादप्रमाणे यंदाही पीर महादेव यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दि. १३ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत. यात्रा महोत्सवानिमित्त ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवारी दि. १३ मे रोजी पहाटे ५ वाजता महादेवाला अभिषेक करण्यात येणार असून सकाळी ७ वाजता श्री महादेव पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवेढा येथील हलगी वादनासह पालखी मिरवणूक गावातून मार्गक्रमण करणार असून सायंकाळी ७ वाजता पीरसाहेब गंध कार्यक्रम होणार आहे.
गुरुवारी दि. १४ मे रोजी सकाळी ९ वाजता “कलगी तुऱ्याचे गाणे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता पीर साहेब गलीफ भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शुक्रवारी दि. १५ मे रोजी दुपारी ४ वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविक व पैलवानांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रात्री ८ वाजता नयनरम्य शोभेचे दारूकाम होणार असून रात्री १० वाजता सामाजिक, कौटुंबिक व हास्यप्रधान कन्नड नाटक सादर करण्यात येणार आहे.
या यात्रा महोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीर महादेव यात्रा पंच कमिटी, ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ वांगी यांच्या वतीने करण्यात आले आहे.



























