पंढरपूर – दिवाळीच्या प्रकाशपर्वाला धनत्रयोदशीच्या मंगलमय मुहूर्तावर पंढरपुरातील पवित्र चंद्रभागा नदीचा तीर लक्ष लक्ष दीपांनी उजळून निघाला. वारकरी संप्रदाय आणि शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य दीपोत्सवामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात भक्ती, श्रद्धा आणि प्रकाशाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. हजारो पणत्यांच्या लखलखत्या प्रकाशाने चंद्रभागा घाट आणि परिसर उजळून निघाला होता. हा दीपोत्सव पाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण म्हणून साजरा केला जातो. वसुबारसेपासून सुरू होणाऱ्या या दीपोत्सवाच्या पर्वात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. याच दिवसाचे औचित्य साधून पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या तीरावर आणि विविध घाटांवर दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली. वारकरी संप्रदाय आणि शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाला यंदाही नागरिक आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात, घाटांवर तसेच मंदिर परिसरात हजारो पणत्यांची सुंदर मांडणी करण्यात आली होती. सायंकाळ होताच या पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या आणि संपूर्ण चंद्रभागा तीर प्रकाशमय झाला. नदीच्या पात्रात प्रतिबिंबित होणारा दिव्यांचा प्रकाश, घाटांवर लावलेल्या दीपमाळा आणि परिसरातील रोषणाई यामुळे अत्यंत मनोहारी दृश्य निर्माण झाले होते. जणू काही चंद्रभागेच्या वाळवंटात दिवाळीचे प्रकाशपर्व अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना येत होता.
गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा दीपोत्सवाचा सोहळा केवळ दिव्यांची आरास नसून पंढरपूरच्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचे आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाचे प्रतीक बनला आहे. या उपक्रमात स्थानिक नागरिक, वारकरी, भाविक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. अनेक नागरिक स्वतः पणत्या लावून या उपक्रमात योगदान देतात. त्यामुळे लोकसहभागातून साकारला जाणारा हा दीपोत्सव सामाजिक एकात्मता आणि धार्मिक परंपरेचेही दर्शन घडवतो.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने चंद्रभागा तीरावर साकारलेली दीपमाळ पाहण्यासाठी पंढरपूरकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिव्यांच्या प्रकाशात उजळलेला चंद्रभागेच्या तिराच्या या मनोहारी दृश्याचा आनंद घेत अनेकांनी दीपोत्सवाचे कौतुक केले.
दिवाळीच्या प्रकाशपर्वाची सुरुवात चंद्रभागेच्या साक्षीने लक्ष लक्ष दिवे प्रज्वलित करून करण्याची ही परंपरा गेली पंचवीस वर्षे जपली जात आहे. वारकरी संप्रदाय आणि शिवभक्त प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे पंढरपूरच्या धार्मिक वैभवात भर पडत असून, भक्ती आणि प्रकाशाचा हा सोहळा पंढरपूरच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे.
Views: 9