दिवाळीच्या सणात प्रत्येकाच्या घरात आनंदाचा प्रकाश पोहोचावा, या सामाजिक बांधिलकीतून गुळवंची ग्रामपंचायतीने गावातील दिव्यांग बांधवांसाठी विशेष उपक्रम राबविला. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील ५ टक्के विशेष निधीतून गावातील २९ नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना किराणा साहित्याच्या किटचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांची दिवाळी अधिक आनंददायी झाली.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतींनी स्वनिधीतील ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. त्यानुसार गुळवंची ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावातील २९ दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप केले.
महागाई आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात मिळालेली ही मदत लाभार्थ्यांसाठी दिलासादायक ठरली. या किराणा किटमध्ये खाद्यतेल, साखर, रवा, हरभरा डाळ, शेंगदाणे, गूळ, चकली मसाला, चिवडा मसाला, मोती साबण आणि चुरमुरे आदी साहित्याचा समावेश होता.
या उपक्रमाबद्दल दिव्यांग बांधवांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार मानले.
यावेळी प्रशासक तथा पंचायत समिती उत्तर सोलापूरचे विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे, ग्रामसेविका सरवदे, माजी सरपंच सुनील जाधव, विष्णू भोसले, पोलीस पाटील तानाजी यादव, धनाजी भोसले, रवी पवार, आकाश जाधव, विनोद नवगिरे, अकबर सय्यद, सुभाष नवगिरे, ज्योतिराम जगताप, सारिका इंगळे, शशिकांत रुपणर, विष्णू पवार, हरी क्षीरसागर, सुहास भोसले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अमोल बोराडे व परसराम कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Views: 12