पंढरपूर – स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पंढरपूरच्या संकल्पनेला बळ देत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ‘एक दिवस, एक तास आणि एकसाथ’ या उपक्रमांतर्गत शहरात भव्य सामूहिक श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भीमा नदी वाळवंट परिसरात नगराध्यक्षा डॉ प्रणीता भगीरथ भालके यांच्या सहभागाने स्वच्छता अभियानास सुरुवात झाली. नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसराची स्वच्छता केली.
या अभियानांतर्गत शहरातील विविध प्रमुख मार्ग, चौक व सार्वजनिक परिसरांमध्ये एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विणे गल्ली ते धोंडोपंतदादा मठ, न.पा. गॅरेज ते दगडी पूल रोड, महात्मा फुले चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कमान, भूयाचा मारुती ते उपजिल्हा रुग्णालय कॉर्नर व उकळीकर बोळ, चंद्रभागा बस स्थानक सुलभ शौचालय ते सरगम चौक ते अकलूज नाका, तसेच के.बी.पी. कॉलेज चौक ते चंद्रभागा स्थानक सुलभ शौचालय* या परिसरांमध्ये स्वच्छता करण्यात आली.
पंढरपूर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने शहराची स्वच्छता व सार्वजनिक परिसरांचे सुशोभीकरण याला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून‘स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी’* हा संदेश देण्यात आला.
नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांना नवी ऊर्जा मिळाली असून, नागरिकांनीही स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.




















