पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवाचा भक्तिमय वातावरणात मंगळवारी (दि.१५) दिमाखात शुभारंभ झाला. सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य तसेच कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव आणि व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या प्रारंभी मान्यवर व कलाकारांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भजनसम्राट पं. शंकरराव वैरागकर यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘जय जय विठोबा रखुमाई’, ‘विठ्ठल परब्रह्म’, ‘वेढा रे वेढा पंढरी’, ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’ यांसह विविध अभंगांचे भावपूर्ण सादरीकरण करून उपस्थित रसिकांना भक्तिरसात चिंब भिजविले.
यावेळी पंडीत वैरागकर यांना अॅड.संकेत जोशी (तबला), ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज), माऊली पिसे (टाळ) तसेच अथर्व वैरागकर व ईश्वरी वैरागकर (स्वरसाथ) यांनी सुरेल साथसंगत केली.
चौकट : ( कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन) पहिल्याच दिवशी पंढरपूरमधील कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय संगीत मैफलीचा आनंद घेतला. पुढील पाच दिवस आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नामवंत कलाकारांची गायनसेवा श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी समर्पित होणार असून, संगीतप्रेमी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 10