सोलापूर – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पुरस्कारांनाच आता प्रशासकीय दिरंगाईचे ग्रहण लागले आहे. आदर्श शिक्षक, आदर्श अभियंता आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडल्याने गुणवंत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, पुरस्कारांची निवड प्रक्रिया आणि वितरण वेळेत होत नसल्याने चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेले कर्मचारी ग्रामीण भागातील शिक्षण, विकासकामे, पाणीपुरवठा, ग्रामविकास तसेच प्रशासकीय कामकाजात योगदान देतात. अशा कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. मात्र, मागील काही वर्षांपासून ही प्रक्रिया नियमित राहिलेली नाही.त्यामुळे प्रशासनाच्या या आश्वासनानंतर पुरस्कार वितरणाचा रखडलेला प्रवास खरोखरच पूर्ण होतो का, याकडे आता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रखडलेल्या पुरस्कारांच्या प्रश्नावर प्रशासनाने आता हालचाली सुरू केल्या आहेत. सर्व आस्थापनविषयक प्रलंबित बाबींसह आदर्श शिक्षक, अभियंता आणि ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण पुढील पंधरा दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली.
चौकट
तीन वर्षांपासून पुरस्कार रखडले
आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण गेल्या तीन वर्षांपासून झाले नसल्याचे समोर आले आहे. आदर्श शिक्षक आणि आदर्श अभियंता पुरस्कारांची स्थितीही अशीच असल्याने संबंधित प्रस्ताव आणि निवड प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुरस्कारासाठी पात्र कर्मचाऱ्यांची निवड, प्रस्तावांची छाननी आणि अंतिम मान्यता याबाबत वेळापत्रक निश्चित करून प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे.
चौकट
प्रोत्साहनाऐवजी प्रतीक्षाच
गुणवंत कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित केल्याने इतर कर्मचाऱ्यांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे पुरस्कार केवळ सन्मानापुरते मर्यादित न राहता प्रशासनातील कार्यक्षमतेला चालना देणारे माध्यम ठरतात. मात्र, पुरस्कारच वेळेत मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या उत्साहावर परिणाम होत असल्याची भावना आहे.
Post Views: 11