पंढरपूर – येथील युवा उद्योजक ऋषिकेश भट्टड यांच्या ‘तुळशीगंध अगरबत्ती’ या अभिनव उपक्रमाला अटल इनोव्हेशन मिशन (AIM), नीती आयोग यांच्या वतीने ‘ग्रासरूट इनोव्हेशन रिकग्निशन २०२६’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ३१ जुलै २०२६ रोजी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवकल्पनेचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तुळशीगंध अगरबत्ती हा उपक्रम मंदिरातील पवित्र निर्माल्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर करून कोळसामुक्त, नैसर्गिक अगरबत्ती तयार करतो. या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे मंदिरातील निर्माल्याच्या विल्हेवाटीची समस्या कमी होण्यास मदत होत असून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, स्थानिक महिलांसाठी रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासाला चालना मिळत आहे. श्रद्धा, पर्यावरण आणि उद्योजकता यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल घेण्यात आली आहे.
या यशामागे एसव्हीईआरआय (SVERI), पंढरपूर येथील ACIC सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. आशिष भुतडा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनासह ACIC इन्क्युबेशन सेंटरच्या भक्कम पाठबळामुळे या नवकल्पनेला संशोधनापासून व्यावसायिक यशापर्यंत सक्षम दिशा मिळाली. हा राष्ट्रीय सन्मान तळागाळातील नवोपक्रम, प्रभावी मार्गदर्शन आणि संस्थात्मक सहकार्य यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
Post Views: 4