सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांत आऊटसोर्सिंग एजन्सींमार्फत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक, सफाई कामगारांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून रखडलेले वेतन अखेर त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवक अक्षय अंजिखाने आणि नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल यांनी कामगारांच्या वेतनासाठी आक्रमक भूमिका घेत आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. महापौर विनायक कोंड्याल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. या पार्श्वभूमीवर अंजिखाने व म्याकल यांनी महापालिकेच्या विविध विभागांची पाहणी केली. यावेळी कामगारांच्या मॅन्युअल हजेरीसह पीएफ आणि ईएसआय नोंदींमध्ये त्रुटी असल्याचा दावा त्यांनी केला. मॅन्युअल हजेरीमुळे कंत्राटदारांच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव निर्माण होत असल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर विनायक कोंड्याल यांनी आयुक्तांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कामगारांना वेळेवर वेतन न देणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे आणि गरज असल्यास कंत्राट रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांची मॅन्युअल हजेरी बंद करून बायोमेट्रिक प्रणाली लागू करावी, मागील तीन वर्षांतील पीएफ व ईएसआय योगदानाचे विशेष ऑडिट करावे, तसेच संबंधित विभागप्रमुखांनी दरमहा त्याची पडताळणी करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. नियमभंग आढळल्यास संबंधित एजन्सी व घटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पगार, सुविधा मिळेपर्यंत
पाठपुरावा सुरू राहील
महापालिकेत प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना त्यांचा हक्काचा पगार आणि सामाजिक सुरक्षा सुविधा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहील, असे अंजिखाने व म्याकल यांनी सांगितले.
—-
Post Views: 5