सोलापूर – फिजिओथेरपी ही शरीराच्या बाहेर राहून शरीरातील व्याधी, वेदना किंवा व्यंग दूर करणारी निदान व उपचार पद्धती आहे, तर योगामध्ये बाह्य साधन न वापरता शरीरातल्याच गोष्टींचा वापर करून शरीर निरोगी व सुदृढ बनवता येते, असे प्रतिपादन प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. संदीप भागवत यांनी केले. योग सेवा मंडळाच्या वतीने शिवस्मारक येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सुरुवातीला केवळ मसाज किंवा शेक देण्यापुरती मर्यादित असलेली फिजिओथेरपी आता विकसित झाली असून अनेक प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरून मानवी शरीराच्या दुखण्यांवर उपचार केले जातात. डॉ. भागवत गेल्या २५ वर्षांपासून सोलापुरात ‘निरामय पुनर्वसन केंद्र’ चालवत असून, तिथे जर्मनीहून आणलेली अत्याधुनिक यंत्रे वापरली जातात. सोलापूरसह पुणे व मुंबई येथेही त्यांच्या शाखा कार्यरत आहेत. या कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी योग सेवा मंडळाच्या उपक्रमांची प्रशंसा केली आणि या संस्थेसोबत निरामय फिजिओथेरपी केंद्रामध्ये आरोग्यविषयक लोकांभिमुख कार्यक्रम घेण्याची घोषणा केली.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संतोष सासवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले, तर मनमोहन भुतडा यांनी डॉ. भागवत यांचा परिचय करून दिला. यावेळी सोमनाथ चौगुले, मोहिते व डॉ. राधेश्याम अग्रवाल यांचा लग्न दिवसाच्या निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला योग प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांच्या प्रश्नांना डॉ. भागवत यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष जोशी, प्रसाद चावरे, वैजनाथ देवगण, सौ. वासंती निंबाळकर, शारदा जोशी, सुनीता न्यामने यांनी परिश्रम घेतले. शेवटी मंडळाचे सचिव दत्तगुरु वेदपाठक यांनी आभार मानले.






















