पंढरपूर – महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या गुलाबी रिक्षा चालक सौ.सोनाली अरुण दळवी या महिलेच्या हस्ते करून समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डी.राज सर्वगोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष प्रणिता भालके तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य दुर्गाताई अंकुशराव, पंचायत समिती सदस्य अक्काताई लोखंडे, नगरसेविका उज्वलाताई भालेराव, नगरसेविका अनिता ढवळे, माजी नगरसेविका शकुंतला नडगिरे, श्वेताताई डोंबे, राजश्री सर्वगोड या उपस्थित होत्या. यावेळी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाची गुलाबी ई-रिक्षा योजना प्रामुख्याने महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व सक्षम करण्यासाठी,प्रदूषणात घट करणे आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी आणि महिला प्रवाशांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या गुलाबी रिक्षा चालक सोनाली दळवी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिष्ठानच्या वतीने एक वेगळा संदेश देण्यात आला.
गतवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरे करणारे मंडळ म्हणून विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानची ओळख निर्माण झाली आहे.

















