सांगोला – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उपजतच चिकाटी आणि संघर्षातून उभे राहण्याची जिद्द असते. आज विद्यामंदिरच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या गुणवत्तेला योग्य दिशा दिल्यानेच ही प्रशाला एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक संख्येत राज्यात तिसऱ्या स्थानावर झळकली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी केले. ते विद्यामंदिर परिवाराच्या सांगोला, नाझरा, कोळा या शाखांमधील ७४ एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगलीचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य बिभीषण माने, उपमुख्याध्यापक चारुदत्त जगताप, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे उपस्थित होते.
प्रारंभी कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मनोगतात महेश धोत्रे यांनी गणित व विज्ञानातील मूलभूत संकल्पनांवर भर देण्याचे आवाहन केले. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी आत्मविश्वास ही यशाची जननी आहे या उक्तीप्रमाणे आव्हानांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भोरे, आशुतोष नष्टे तर पारितोषिक वाचन अमोल महीमकर, वैभव कोठावळे यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रदीप धुकटे यांनी मानले.
५ वर्षांत १ कोटी ५३ लाखांचे अर्थबळ
२०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीत विद्यामंदिर परिवारातील एकूण ३२० विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांत एकूण १ कोटी ५३ लाख ६० हजार रुपये इतकी भरघोस शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा एक मोठा आधार ठरला आहे.


























