
सोलापूर – भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कमी करण्यात आल्याने पिके धोक्यात आली असून, शेतीसाठी आवश्यक वीज, पाणी आणि नुकसानभरपाईच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी शेट्टी यांनी सांगितले की, भीमा नदी कालव्यावरील शेतकऱ्यांना सध्या केवळ दोन तास वीजपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने जगविलेली पिके आता पावसाळ्याच्या तोंडावर वीजअभावी संकटात सापडली आहेत. त्यामुळे हा आदेश तात्काळ रद्द करून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना किमान आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील विहीर, बोअरवेल व इतर कृषी पंपधारक शेतकऱ्यांना सलग दहा तास पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा देण्याची मागणीही केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी उजनी धरणातून शेतीसाठी अतिरिक्त पाणी सोडणे, भीमा नदीवर अत्याधुनिक बंधारे उभारणे आणि जिल्ह्यातील थकीत ऊस बिले तातडीने अदा करावीत, अशा मागण्याही निवेदनातून मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, २०२५ मधील पीकविम्याची रक्कम त्वरित वितरित करणे, कर्जमाफीतील अटी-शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू करणे, महापुरामुळे नदीकाठच्या जमिनींचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तातडीची नुकसानभरपाई देणे, तसेच वीज खांब, तारा व ट्रान्सफॉर्मरच्या बिघाडामुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी महावितरणने स्वीकारून भरपाई द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, शेतीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी माजी खासदार राजु शेट्टी, जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, मोहसीन पटेल, तानाजी बागल, सचिन पाटील, शिवाजी पाटील, इकबाल मुजावर, अब्दुलराइझाक मकानदार, अजिनाथ परबत, सचिन अटकळे,शहाजान शेख, युवराज घुले आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.
Post Views: 10