सांगोला – राष्ट्रीय जनगणना-२०२७ चे कर्तव्य बजावत असताना तीव्र उष्माघाताने निधन झालेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे आदर्श शिक्षक कै.राजेंद्र दामोदर ढोले यांच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी. तसेच केवळ सांगोलाच नव्हे तर सध्याच्या भीषण उन्हात कर्तव्य बजावताना राज्यभरात इतरही अनेक ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडल्या असून, शासनाने या संपूर्ण परिस्थितीचा व्यापक विचार करून राज्यातील सर्वच शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी आग्रही मागणी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन करत यासंदर्भात निवेदन सुपूर्द केले.
या प्रकरणाबाबत माहिती देताना, शिक्षक कै.राजेंद्र ढोले हे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना उष्माघाताचे बळी ठरले आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे ढोले मळा (सांगोला) येथील त्यांचे कुटुंब संपूर्णपणे उघड्यावर पडले आहे. मात्र, ही समस्या केवळ सांगोला पुरती मर्यादित नसून, सध्या संपूर्ण राज्यात तापमान ४२ ते ४४ अंशांच्या पार गेल्याने जनगणना करणाऱ्या राज्यातील अनेक शिक्षकांना उष्माघाताचा तीव्र त्रास होत आहे आणि काही ठिकाणी शिक्षकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे शासनाने या सर्व प्रकरणांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी सांगितले.
आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख मागण्या
शासकीय नियमाप्रमाणे शिक्षक कै.राजेंद्र ढोले यांच्या कुटुंबाला देय असणारी अनुग्रह अनुदान रक्कम विनाविलंब मंजूर करून ती त्वरित अदा करण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीस प्राधान्य देऊन तातडीने अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, सर्व पीडित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही समान न्याय देऊन आर्थिक व प्रशासकीय दिलासा द्यावा, उन्हाची तीव्र लाट लक्षात घेता जनगणनेच्या क्षेत्रीय कामाच्या वेळेत बदल करण्यात यावा किंवा शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात.
Post Views: 10