
सोलापूर -लोकांशी एकरूप होऊन त्यांच्या अडचणी सोडविणारे राजर्षि शाहू महाराज लोककल्याणकारी राज्यकर्ते होते.त्यांचे कार्य लोकोत्तर आहे. त्यांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. प्रसंगी शिक्षण सक्तीचे केले. जातीच्या भिंती पाडल्या. अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य हाती घेऊन जातीअंताच्या लढ्याला गतिमान केले असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए.आर. बुर्ला महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षि शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ.अशोक यक्कलदेवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर डॉ. शंकर राजे,डॉ ॲनी जॉन डॉ. टी. एन.शिंदे, डॉ. शिवानंद भांजे, डॉ. रंजना बनसुडे व आदी मान्यवर उपस्थित होते .पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, राजर्षि शाहू महाराज बोलघेवडे नव्हते तर कृतिशील होते.कर्मकांडात अडकून पडलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला. आर्थिक दुरावस्थेमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी शिष्यवृत्ती देण्याचे धोरण स्वीकारले. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी प्रत्येक जातीसाठी वसतिगृह सुरू केली त्यामुळेच त्यांना वसतिगृहाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी आंतरजातीय विवाहाला पाठिंबा दिला त्याचबरोबर त्यांनी कोल्हापूर संस्थानांमध्ये औद्योगिक विकास व्हावा शेतीचा विकास व्हावा यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अशोक यक्कलदेवी म्हणाले की, राजर्षि शाहू महाराज हे राजा असूनही कोणतीही औपचारिकता न पाळता लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी जाणून त्या अडचणी सोडविणारे थोर राज्यकर्ते होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. टी.एन. शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर राजे यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयामधील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.





















