सोलापूर : औराद महसूल मंडळाच्या कार्यक्षेत्रातील बंकलगी, सांजवाड आणि राजूर शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उपसा सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही संबंधित यंत्रणा आणि मंडल अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा परिसरात रंगली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औराद मंडल अधिकारी कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या मुरूम उपसा सुरू आहे. विशेषतः बंकलगी व राजूर शिवारातील रस्त्यालगतच्या शेतांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. काही वाहनांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणावर मुरूम वाहतूक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकाराकडे महसूल प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता आणि शासनाचा महसूल बुडवून मुरूम उपसा सुरू असताना कारवाई होत नाही. उलट घरबांधणी किंवा शेतीच्या कामासाठी मुरूम टाकणाऱ्या सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कारभाराबाबत दुजाभावाची भावना निर्माण झाल्याचे नागरिक सांगत आहेत.
या संदर्भात मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अवैध मुरूम उपसा सुरू ठेवण्यासाठी काही व्यक्ती प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा सुरू असून, यामुळे संशय अधिकच बळावला आहे.
तसेच अवैध मुरूम उपशाविरोधात आवाज उठविणाऱ्या नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याचे आरोपही समोर येत आहेत. तक्रारदारांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून महसूल विभागातील संबंधित अधिकारी व अवैध उपशास मदत करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उपोषणाचा इशारा
अवैध मुरूम उपसा रोखण्यासाठी तसेच महसूल विभागातील कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी तातडीने कारवाई न झाल्यास मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासन कोणत्या भूमिकेतून पाहते, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.
….
तहसीलदारांवर वाॅच ठेवणार्यांवर कारवाई कधी ?
..,.
तहसील कार्यालयामधील अधिकार्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध ठेऊन व मंद्रूप तहसीलदारांवर दररोज शेकडो ब्रास अवैद्य मुरूम सुरू आहे. अधिकार्यांवर वाॅच ठेऊन व शासनाची राॅयल्टी बुडवून मुरूम उपशास सहकार्य करणार्या व्यक्तींवर कारवाई कधी होणार ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Post Views: 8