पंढरपूर – मिरे (ता.माळशिरस) येथील अविनाश निवृत्ती शिरगिरे यांनी उतरवलेल्या भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण डाक जीवन विम्यातून त्यांच्या निधनानंतर रु. १० लाख ९७ हजार ८२१ चा धनादेश त्यांच्या वारसदार पत्नी कोमल अविनाश शिरगिरे याना अधिक्षक डाक, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांच्या कार्यालयामध्ये नुकताच सुपूर्द करण्यात आला.
आजच्या धावपळीच्या काळामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही याची जाण ठेऊन माळशिरस तालुक्यातील मिरे येथील अविनाश निवृत्ती शिरगिरे यांनी आपण नसल्यानंतरही आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये ही गोष्ट लक्षात घेऊन बचत आणि सुरक्षा यांचा विचार करून भारतीय डाक विभागाची ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी त्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये घेऊन वार्षिक हप्ता रु. ५४ हजार ३५० भरून गुंतवणुकीस सुरुवात केली.
विमा स्वीकृती नंतर तीन वर्षाच्या आतच अविनाश शिरगिरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून रीतसर प्रक्रिया पूर्ण करून पंढरपूर डाक विभागामार्फत त्यांच्या वारसदार पत्नी श्रीमती कोमल अविनाश शिरगिरे याना विमाच्या रकमेचा रु. १० लाख ९७ हजार ८२१ चा धनादेश मंगळवारी (दि.१६ डिसेंबर) अधिक्षक डाकघर, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांच्या कार्यालयामध्ये पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर, जन तक्रार निवारण अधिकारी राजेश शर्मा, पंढरपूर मुख्य डाकघरचे पोस्ट मास्टर सोमनाथ गायकवाड, विकास अधिकारी सोमनाथ कोरके सह कार्यालयातील इतर कर्मचारी यांच्या उपस्थित सुपूर्द करण्यात आला.
———————–
अशी आहे योजना
ग्रामीण डाक जीवन विम्या (RPLI) ग्रामीण भागातील कायमचे वास्तव्य असणारी आणि आगामी वाढदिवसादिवशी ज्यांचे वय १९ ते ५५ दरम्यान असणारी कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेचा लाभ १० लाखापर्यंत घेऊ शकतो. तसेच भारतीय डाक विभागाची डाक जीवन विमा (PLI) योजना केंद्र / राज्य कर्मचाऱ्यांसोबतच आता डिप्लोमा, पदवीधर यांच्याकरिता हिताची आहे. कोणत्याही शाखेचे पदवीधरांसाठी उपलब्ध झाली आहे या योजनेत कमी हप्ता व जास्त बोनसचा लाभ मिळतो. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे या योजनेचा लाभ ५० लाखापर्यंत घेऊ शकतो. या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा, असे आवाहन पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर यांच्याकडून करण्यात आले आहे.


















