बार्शी – श्री गणेशोत्सव २०२६ हा उत्सव बार्शी शहरात शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने बार्शी शहर पोलीस ठाण्याच्यावतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शी शहरातील मुख्य मार्गावरुन रुट मार्च काढण्यात आला. सदर रुट मार्च पोलीस निरीक्षक श्री. गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ५ पोलीस अधिकारी, ५२ पोलीस अंमलदार, १ एसआरपीएफ प्लाटूनचे २६ जवान, तसेच ४४ होमगार्ड असे सहभागी झाले होते. त्याचबरोबर वरीलप्रमाणे पोलीस बंदोबस्त गणेशोत्सव २०२६ करिता बार्शी शहरांमध्ये तैनात करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात शहरातील गर्दी, वाहतूक व्यवस्था, गणेश मंडळांचे कार्यक्रम, मिरवणुका व विसर्जन सोहळा यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्यावतीने विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार डीजे, डॉल्बी व तत्सम ध्वनीप्रणालीच्या वापराबाबत निर्बंध लागू आहेत. त्यामुळे बार्शी शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या आदेशांचे व ध्वनीविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गणेशोत्सव मंडळांनी डीजे-डॉल्बीऐवजी ढोल, ताशा, हलगी, संबळ, लेझीम यासारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करुन आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपावा, असे आवाहन बार्शी शहर पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
बार्शी शहर पोलीस ठाणे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असून, गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी केले आहे.
Post Views: 8