पंढरपूर – बलात्कार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप असलेल्या फौजदारी प्रकरणात पंढरपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश हिं.ल.मनवर यांनी महत्त्वाचा निकाल दिला आहे. अभियोग पक्षाला (सरकारी पक्षाला) आरोप संशयापलीकडे सिद्ध करता न आल्यामुळे आरोपी सोमनाथ भाऊसाहेब जाधव (वय ३०, रा. हरी ओम रेसिडेन्सी, इसबावी, पंढरपूर) यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार (गु.र.नं. ४३७/२०२१), आरोपी सोमनाथ जाधव याने १५ मार्च २०२१ ते १३ जून २०२१ या कालावधीत पीडितेला धमकावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, तसेच मारहाण व धमकी दिली, असा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.वि. कलम ३७६, ३२३, ५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान खटल्याच्या सुनावणी दरम्यान पिडीता, तिचे वडील आणि इतर पंच साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. बचाव पक्षातर्फे ॲड. किर्तीपाल सर्वगोड यांनी न्यायालयासमोर साक्षी-पुराव्यांमधील महत्त्वाच्या बाबी, परस्परविरोधी विसंगती आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे सविस्तर व प्रभावी युक्तिवाद केला.
तपासा दरम्यान पंच साक्षीदारांची साक्ष योग्य रीतीने सिद्ध न झाल्याने आणि पुराव्यांमधील त्रुटींमुळे सरकारी पक्ष आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व उपलब्ध पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने सोमनाथ जाधव यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. किर्तीपाल सर्वगोड, ॲड. चैताली सरवदे आणि ॲड. देवेंद्र सरवदे यांनी प्रभावीपणे कायदेशीर बाजू मांडून काम पाहिले.
Post Views: 7