
सोलापूर – रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ पुणे यांच्या वतीने दि. ६ व ७ जून २०२६ रोजी विमाननगर, पुणे येथील आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅकवर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट ओपन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत सोलापूरच्या विनर्स फाउंडेशनची अवघ्या सहा वर्षांची स्केटर संयुक्ता पोतदार हिने उल्लेखनीय कामगिरी करत सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इनलाईन स्केटिंग प्रकारातील लाँग रेसमध्ये रजत पदक आणि शॉर्ट रेसमध्ये सुवर्ण पदक पटकावत संयुक्ताने आपल्या कौशल्याची छाप पाडली.
तिच्या या यशामुळे स्केटिंग क्षेत्रात सोलापूरचे नाव पुन्हा एकदा राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे. संयुक्ताच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी प्रकाश मोहार, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड तसेच दयानंद महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी विजयकुमार उबाळे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याच स्पर्धेत सहभागी झालेल्या विनर्स फाउंडेशनच्या इतर खेळाडूंनीदेखील आपल्या-आपल्या वयोगटात उत्कृष्ट प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्यांच्या दमदार कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सम्यक मोहोळकर, सागर राठोड, सिद्धू सुतार आणि वासूदेव कैरमकोंडा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संयुक्ता पोतदार आणि इतर खेळाडूंच्या यशाबद्दल सोलापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी व विविध स्तरांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




















