सोलापूर – नवीन शैक्षणिक वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप पूर्ण पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी तब्बल २१ लाख ९९ हजार ५२२ पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली होती. मात्र, आतापर्यंत केवळ ५ लाख ५५ हजार ४१२ पुस्तकेच जिल्ह्याला प्राप्त झाली आहेत. त्यामुळे अनेक शाळांना पुस्तकांची प्रतीक्षा करतच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करावी लागणार आहे.
राज्य शासनाकडून बालभारतीमार्फत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जातात. यंदा विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पुरवठा अत्यल्प प्रमाणात झाल्याने वितरण प्रक्रियेत मोठा विलंब निर्माण झाला आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेली पुस्तके तालुकास्तरावर पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही शाळांना अंशतः पुस्तके मिळाली असली तरी अनेक विषयांची पुस्तके अजून पोहोचलेली नाहीत. परिणामी, शिक्षकांना अध्यापनाचे नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरळीत सुरू होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये या समस्येची तीव्रता अधिक जाणवत आहे. अनेक पालकांनी शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके मिळावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, अद्याप बहुतांश पुस्तकांचा पुरवठा बाकी असल्याने विद्यार्थ्यांना पहिल्या काही दिवसांत वहीवरच अभ्यास करावा लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने उर्वरित १६ लाख ४४ हजार ११० पुस्तके लवकरच उपलब्ध होतील, असा दावा केला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे “डिजिटल शिक्षणाच्या गप्पांपेक्षा विद्यार्थ्यांच्या हातात वेळेवर पुस्तके पोहोचणे अधिक महत्त्वाचे” असल्याची भावना शिक्षक व पालकांमधून व्यक्त होत आहे.
चौकट
पुस्तकांची एकूण मागणी : २१,९९,५२२
आतापर्यंत प्राप्त पुस्तके : ५,५५,४१२
अद्याप येणे बाकी : १६,४४,११०
Post Views: 6