सोलापूर – हरियाणा राज्यातील रोहतक येथे दि. ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या १३ व्या स्टुडन्ट ऑलिम्पिक राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमी, मंद्रूपच्या खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत तब्बल सात सुवर्णपदके पटकावली. या उल्लेखनीय यशामुळे मंद्रूपसह दक्षिण सोलापूर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या सातही सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील कर्नाटक, हरियाणा पंजाब, आसाम असे अनेक राज्यांतील हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या आणि उच्च दर्जाच्या सामन्यांमध्ये मंद्रूप दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, वेग, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्ण यशाची नोंद केली.
या स्पर्धेत श्रेया पवार, आरोही कदंले, श्रावणी नंदुरे, सफीना शेख, समर्थ चव्हाण, प्रेम चव्हाण आणि सोहम चव्हाण यांनी आपल्या-आपल्या वजनी गटात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. सातही खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रभावी खेळ सादर करून राष्ट्रीय विजेतेपद मिळवले आणि दक्षिण सोलापूरच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला.
तर या सातही खेळाडूंची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकविणार आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेले हे यश आणि त्यानंतर मिळालेली आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी ही संपूर्ण दक्षिण सोलापूरसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पालक, क्रीडाप्रेमी आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच प्रशिक्षक आणि दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीच्या कार्याचेही सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Post Views: 21