सध्याची लोकसंख्या ११ लाखांवर आणि क्षेत्रफळ अंदाजे १५० स्क्वेअर किलोमीटर व सात पोलिस ठाणी, अशी सोलापूर पोलिस आयुक्तालयाची सद्य:स्थिती आहे. दरवर्षी चार हजारांहून अधिक गुन्हे दाखल होतात. चोरी, घरफोडी, कौटुंबिक छळ, अत्याचार, विनयभंग, अशा गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. तरीदेखील शहर पोलिसांकडील मनुष्यबळ दोन हजार ९२ अंमलदार व ११५ अधिकारी एवढेच आहे. राज्यातील बहुतेक शहर- जिल्ह्यातील स्थिती जवळपास अशीच आहे.
सोलापूर शहराचा १९९०च्या दशकातील विस्तार आणि सद्य:स्थिती यात खूप मोठा फरक झाला आहे. विस्तार वाढला तरीदेखील पोलिस ठाण्यांची संख्या मर्यादितच असून अवघ्या सात पोलिस ठाण्यांसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय हे राज्यातील एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे सर्वाधिक सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यातही सोलापूर शहर राज्यात अव्वल आहे. तरीदेखील ना पोलिस आयुक्तालयाचा विस्तार होतोय ना मनुष्यबळात वाढ झाली.काही वर्षांपूर्वी शहरांतर्गत नवीन पोलिस ठाणे निर्मिती व नव्याने पदनिर्मितीचा प्रस्ताव गृह विभागाला यापूर्वीच पाठवला आहे, पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही हे विशेष. नवीन आकृतिबंधानुसार नवीन पोलिस ठाण्यांना वाढीव मनुष्यबळ मिळणार आहेत, पण जुन्या पोलिस ठाण्यासाठी हा आकृतिबंध लागू नसल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण व तपासाचा वेग कमीच असल्याची वस्तुस्थिती आहे.