सोलापूर – रेल्वेच्या ७९व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवून साऊथ सोलापूर आपटे ब्लू आणि मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.
सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात साऊथ सोलापूर आपटे ब्लू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने २० षटकांत सर्वबाद १२३ धावा केल्या. यात वैष्णव जावळेने ४५ आणि विवेक अंचीने २९ धावांचे योगदान दिले. साऊथ सोलापूरकडून गोलंदाजीत संकेत काखंडकीने ५ धावांत २ बळी, तर अतुल चौधरी आणि हर्षल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. स्वप्निल हंचाटे, बाळकृष्ण काशीद व नारायण डोके यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना साऊथ सोलापूर आपटे ब्लू संघाने १८.२ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १२४ धावा करत ३ गडी राखून विजय मिळवला. अरशीन कुलकर्णीने नाबाद ६७ धावांची मॅचविनिंग खेळी केली, तर निरंजन कदमने १७ व संकेत काखंडकीने १६ धावा केल्या. मॉडेल क्रिकेट क्लबकडून सुधनव मनुरने २ आणि यश बोरामणी, स्वराज वाले, सुदेश राठोड व ओंकार रोकडे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
६७ धावांच्या नाबाद खेळीसाठी अरशीन कुलकर्णीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य व ज्येष्ठ संपादक श्री. अजितकुमार संगवे यांच्या हस्ते सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विक्रांत पवार, अंबादास तोरा, लियाकत शेख, सतपाल सिंग आणि सचिन गायकवाड उपस्थित होते. या सामन्यात सचिन गायकवाड व दया नवले यांनी पंच म्हणून तर विशाल कुलकर्णी यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.
दुपारच्या सत्रात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६८ धावांचा मजबूत धावसंख्या उभारली. सलामीवीर प्रवीण देशेट्टीने ९५ धावांची वादळी खेळी केली. वेदांत काळेने १७ तर जसन सिंगने ११ धावा केल्या. परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूटकडून इम्रान हाकने ३, प्रेम देवकरने २, तर आर्यन देशमुख व करुणेश उनवे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
१६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूटचा डाव १६.३ षटकांत १२६ धावांवर आटोपला. आर्यन देशमुखने सर्वाधिक ४८ धावा केल्या, तर इम्रान हकने १४ आणि प्रेम देवकरने ११ धावा केल्या. मध्य रेल्वे सोलापूरकडून सिद्धार्थ नका याने ३ बळी, तर लखन गावडे आणि आदित्य दडे यांनी प्रत्येकी २ बळी घेत संघाच्या ४२ धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
९५ धावांच्या धडाकेबाज खेळीसाठी प्रवीण देशेट्टीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सोलापूर जिल्हा क्रिकेट निवड समितीचे चेअरमन राहिलेले वरिष्ठ क्रिकेटपटू के. टी. पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विक्रांत पवार, राजा पटेल, गौतम बनसोडे आणि सचिन गायकवाड उपस्थित होते. सामन्यात महेश सोनवाने व अशोक डोंबाळे यांनी पंच म्हणून तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखक म्हणून जबाबदारी सांभाळली. कै. सुरेश मालप यांच्या स्मरणार्थ सुदेश व सुनील मालप यांनी या स्पर्धेच्या ट्रॉफी पुरस्कृत केल्या आहेत.
आज अंतिम महामुकाबला
सकाळी ११:०० वाजता : मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर विरुद्ध साऊथ सोलापूर आपटे ग्रुप ब्ल्यू.




















