पंढरपूर – निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुर्ननिरीक्षणसाठी कार्यक्रमा अंतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघातील सर्व पात्र नागरिकांची, विशेषतः नवमतदार, महिला व दिव्यांग नागरिकांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनामार्फत मतदार संघात विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
या मोहिमेअंतर्गत पंढरपूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर दिनांक १९,२०,२६ आणि २७ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत १० ते ६ पर्यंत विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांच्या वेळी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी आपापल्या केंद्रांवर वेळेत उपस्थित राहून नागरिकांकडून मतदार नोंदणी, माहितीतील दुरुस्ती तसेच नावे वगळण्याचे अर्ज भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी दि. ०१ ऑक्टोंबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांसाठी नमुना क्र. ६ हा अर्ज करता येईल. मतदार यादीतील चुकीची अथवा मयत,स्थलांतरीत मतदारांची नोंद वगळण्यासाठी नमुना क्र. ७ हा अर्ज करता येईल. तसेच मतदार यादीमधील चुकीच्या नोंदी जसे नाव, वय, लिंग, नातेसंबंध, पत्ता बदल याकरीता नमुना क्र. ८ हा अर्ज करता येईल.
लोकशाही बळकट करणेसाठी प्रत्येक पात्र नागरिकाने नाव नोंदणी करावी. तसेच पात्र मतदार हे यादीत नाव नोंदविण्यापासून वंचित राहणार नाहीत यासाठी पंढरपूर विधानसभा संघातील मतदारांनी सदरच्या विशेष शिबीरामध्ये सहभाग नोंदवून आपले मतदार यादीमधील नोंदी अद्यावत करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी केले आहे.
Post Views: 8