सोलापूर : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक जनजागृती व प्रचारमोहीम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा देण्यात आला असून, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीसह जागतिक स्तरावरील मानांकन मिळवून देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव नसून आध्यात्मिक, सामाजिक तसेच उद्यमशीलतेला चालना देणारा व्यापक लोकचळवळीचा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी वर्षभर विविध माध्यमांतून सातत्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाने दिल्या आहेत.
या माध्यमातून महाराष्ट्राची कला, संस्कृती, परंपरा, ज्ञान, लोकजीवन, हस्तकला, उद्यमशीलता आणि ‘सॉफ्ट पॉवर’ यांचा व्यापक प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाशी संबंधित ऐतिहासिक व पारंपरिक वारसा, घरगुती गणेशोत्सव, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, हस्तकला, पारंपरिक पद्धती, खाद्यपरंपरा आदींचे दस्तऐवजीकरण करून ते Bappa.org या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
‘घराघरी बाप्पा’ उपक्रमातून नागरिकांचा सहभाग
सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच आपल्या कार्यक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण, पारंपरिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या घरगुती गणेशोत्सवांची माहिती Bappa.org वर नोंदविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना शासनाचे अधिकृत ‘Digital Cultural Preserver Certificate’ देण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाशी संबंधित स्थानिक कलाकार, लोककलावंत, पारंपरिक कलाकार, कारागीर तसेच विविध कलांशी संबंधित व्यक्तींची माहिती व त्यांच्या कला-कौशल्याचे दस्तऐवजीकरण करण्यासाठीही कार्यवाही करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग
स्थानिक स्वराज्य संस्था, गृहनिर्माण संस्था, निवासी कल्याणकारी संघटना (RWAs), ग्रामपंचायती तसेच स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून Bappa.org चा प्रचार करण्यासाठी WhatsApp समूहांवर लिंक व QR Code प्रसारित करून नागरिकांचा व्यापक सहभाग नोंदवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रचारासाठी EFlag, डिजिटल माध्यमांचा वापर
प्रचार साहित्य, होर्डिंग, पोस्टर्स, स्टँडीज, WhatsApp QR Code आदींचा सार्वजनिक ठिकाणी प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या अधिकृत X/Twitter, Facebook, Instagram यांसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही या उपक्रमाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक वृत्तपत्रे, केबल नेटवर्क, सोशल मीडिया पेजेस, रेडिओ आणि अन्य माध्यमांद्वारे सातत्यपूर्ण प्रसिद्धी देण्यात येणार आहे. पारंपरिक मूर्तिकार, गणेशमूर्ती घडविणाऱ्या कार्यशाळा, कारागीर व लोककलावंत यांच्या विशेष वार्तांकनासह त्यांची छायाचित्रे, व्हिडिओ व माहिती Bappa.org वर उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत.
जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
या मोहिमेच्या प्रभावी व अखंडित समन्वयासाठी प्रत्येक जिल्ह्यात अनुभवी, वरिष्ठ व जबाबदार अधिकाऱ्याची जिल्हा नोडल अधिकारी/संपर्क अधिकारी (District Nodal Officer/POC) म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्याचे नाव, पदनाम व WhatsApp संपर्क क्रमांक राज्यस्तरीय समन्वय WhatsApp समूहामध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाशी संबंधित जनजागृतीसाठी ‘शुभंकर चिन्हाचा (Mascot)’ वापर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. शाळा ऑफ आर्ट्स तयार केलेल्या केबल्स गणेशोत्सवाच्या शुभंकर चिन्हाचा गणेशोत्सव मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित शासकीय व अशासकीय संस्थांच्या प्रचार साहित्यामध्ये योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे.
साप्ताहिक प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश
राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा नियमित आढावा घेण्यासाठी Bappa.org वरील एकूण नोंदी, प्रत्यक्ष प्रचार उपक्रम, होर्डिंग्ज-पोस्टर्स-स्टँडीजची संख्या, QR Code प्रसार, सहभागी गणेशोत्सव मंडळे व नागरिक, डिजिटल प्रसिद्धीचे उपक्रम तसेच लोकसहभागाची व्याप्ती याबाबतचा साप्ताहिक प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा परंपरा, कला, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने या उपक्रमाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळ तसेच नागरिकांनीही आपल्या घरगुती गणेशोत्सवाचे फोटो, माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
000




















