डिजिटल अॅनाटॉमी ३ डी प्रिंटिंग सुविधा असणारी एमजीएम देशातील तिसरी संस्था
छत्रपती संभाजीनगर, दि.४ : एमजीएम विद्यापीठाच्या इनोव्हेशन इनक्युबेशन अँड रिसर्च सेंटरच्या (आयआयआरसी) वतीने डिजिटल अॅनाटॉमी ३ डी प्रिंटिंग सुविधेचा उद्घाटन सोहळा आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रुक्मिणी सभागृह येथे संपन्न झाला. अशी सुविधा सुरू करणारी एमजीएम ही देशातील तिसरी संस्था असून महाराष्ट्र राज्यात ही सुविधा पहिल्यांदाच सुरू झालेली आहे.


या उद्घाटन सोहळ्यास पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, शास्त्रज्ञ डॉ.रमणदीप सिंग, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडवान्सड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. दिनेशसिंग ठाकूर, स्टार्टासिस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजीव बजाज, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. राजेंद्र बोहरा, डॉ. प्रविण सूर्यवंशी, डॉ.गीता लाटकर, सुदर्शन लाटकर, डॉ.एच.एच.शिंदे, डॉ.अरविंद चेल, प्रा. पंकज ढोबळे, प्रा.अझहर बारगीर व सर्व संबंधित उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यास डीआरडीओचे माजी तंत्रज्ञान संचालक डॉ. यु. चंद्रशेखर आणि मेडिकल स्टार्टासिसचे उपाध्यक्ष ईरेझ बेन जीव्हि यांनी दुरदृश्यप्रणालीमार्फत उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती साळुंखे आणि प्रा.सरफराज अली यांनी केले.
‘जे ८५० डिजिटल अॅनाटॉमी ३ डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ बद्दल माहिती
‘जे ८५० डिजिटल अॅनाटॉमी ३ डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ हे तंत्रज्ञान समकालीन काळामध्ये अत्यंत उपयुक्त असून याचा विविध क्षेत्रामध्ये वापर होत आहे. अॅनाटॉमिकल मॉडेल्स, बायोमेडिकल आणि बायोकंपॅटिबल मटेरियल्स तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शस्त्रक्रिया, उद्योग, शिक्षण आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, वाहन, एरोस्पेस, गायनॉकॉलॉजी, फिजिओथेरपी आणि डिझाइन अशा विविध क्षेत्रात प्रयोग केले जात आहेत.
आरोग्य क्षेत्रातील उपयोग
एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याआधी जी ‘प्री सर्जिकल प्लॅनिंग’ केली जाते त्यामध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. कॅडेव्हर ऑर्गन मिळत नसल्यामुळे शस्त्रक्रिया करणे कठीण जाते मात्र, आता या तंत्रज्ञानाच्या मदतीने तसेच ऑर्गन बनवून त्यावर प्रयोग करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे विविध उत्पादनाची डिझाईन बनविण्यासाठी आणि टेक्सटाइल डिझाईन पेंटिंगसाठीही या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्र एकत्रित येत या माध्यमातून संशोधन करू शकणार आहेत.
‘जे ८५० डिजिटल अॅनाटॉमी ३ डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ किंमत
‘जे ८५० डिजिटल अॅनाटॉमी ३ डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ हे एक प्रगत तंत्रज्ञान असून याची किंमत ५ कोटी रुपये आहे. या तंत्रज्ञानाचा वापर एमजीएम विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि सर्व संबंधित क्षेत्रातील तज्ञ करू शकणार आहेत. या तंत्रज्ञानाची किंमत अधिक वाटत असली तरी याच्या मदतीने सर्वच क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल होणार आहे.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया :
१. ‘रिव्होल्यूशनायझिंग हेल्थ केयर हार्नेसिंग अँड सिनर्जी फॉर इंडस्ट्री ४.२’ या विषयावर बोलताना म्हणाले, एम्समध्ये विविध देशातील सर्जन्स यांना आम्ही प्रशिक्षण देत आलो आहोत. थ्रीडी प्रिंटिंगमुळे आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला असून विशिष्ट मॉडेलची निर्मिती करून शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली तयारी आणि सराव यामुळे करणे शक्य झाले आहे.
: शास्त्रज्ञ डॉ.रमणदीप सिंग
२. स्ट्रॅटेसिस जे ८५० डिजिटल ॲनाटॉमी थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान-केंद्रित सुविधा सुरू केल्याबद्दल मी सर्वप्रथम एमजीएम विद्यापीठाचे अभिनंदन करतो. अलीकडच्या काळात देशातील जवळजवळ सर्व क्षेत्रांवर डिजिटलायझेशनचा प्रभाव होताना आपण पाहत आहोत. एरोनॉटिक्स ते आरोग्यसेवा अशा सर्व क्षेत्रात ३ डी प्रिंटिंग आता मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यूजीसीने सध्या विद्यापीठे आणि उद्योग यांच्यातील कनेक्टिव्हिटीवर खूप भर दिला आहे. आज एमजीएममध्ये या तंत्रज्ञानाची सुरूवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध होतील.
: डॉ. यु. चंद्रशेखर
डीआरडीओचे माजी तंत्रज्ञान संचालक
३. आपण आपला दृष्टिकोन बदलला की आपलं आयुष्य बदलते. या जगामध्ये काहीच अशक्य नसून सगळे शक्य आहे. आपल्या देशातील लष्कर दिवसेंदिवस अधिक तंत्रकुशल होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलेल्या आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय हे ऍडीक्टिव्ह मनिफॅक्चरींगचे उदाहरण आहे. आज ही सुविधा एमजीएममध्ये सुरू होत असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे मी आवाहन करतो.
: डॉ. दिनेशसिंग ठाकूर,
संचालक, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडवान्सड टेक्नॉलॉजी
४. ३ डी प्रिंटिंगमुळे आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांति होताना आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचा आज जगभरातील विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. आज हे तंत्रज्ञान एमजीएम विद्यापीठात सुरू होत आहे, याबद्दल मी विद्यापीठाचे अभिनंदन करतो.
: ईरेझ बेन जीव्हि
उपाध्यक्ष, मेडिकल स्टार्टासिसचे
५. एमजीएम विद्यापीठ कायम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आले आहे. आज विद्यापीठात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संशोधन करीत अनेक गोष्टी शिकता येणार आहेत.
: डॉ. विलास सपकाळ
कुलगुरू,
एमजीएम विद्यापीठ
६. समकालीन काळामध्ये संशोधन आणि विकास या क्षेत्रामध्ये आपण खूप कमी खर्च करतो. आज आपलं देश या क्षेत्रात केवळ ०.७% गुंतवणूक करतोत, ही आपणासाठी चिंतेची बाब आहे. आज ही सुविधा एमजीएममध्ये सुरू होत आहे ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे. आरोग्य क्षेत्रासह इतरही क्षेत्रात या तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल झाला असून उपचार अधिक गतिशील आणि सुलभ होण्यास यामुळे मदत होत आहे.
: डॉ.राजीव बजाज
संचालक,
स्टार्टासिस लिमिटेडचे व्यवस्थापकीय