कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महिलांच्या कार्यालयासमोर रांगा
त.भा.वृत्तसेवा
सोलापूर दि ४ जून – राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये २१ ते ६५ वयोगटातील मुली आणि महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये महिन्याला त्यांच्या बँक खात्यावर वितरित केले जाणार आहेत. सदरची योजना जाहीर केल्यानंतर राज्यातील महिला वर्गामध्ये या योजनेची उत्सुकता होती. मात्र योजनेसाठी लागणाऱ्या रहवासी दाखले सारखे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अशिक्षित तसेच वयोवृध्द महिलांना मोठी अडचण निर्माण झाली होती.
दरम्यान सरकारने यावर तात्काळ निर्णय घेतला सदरची अट शिथिल करत महिलांना दिलासा दिला. मात्र दुसरीकडे ज्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करावयाचा होता. तो नारीशक्ती दूत एप्लिकेशन्सचे सर्वर डाऊन झाल्याने अनेक महिलांची विनाकारण परवड झाली. दोन दिवस झाल्यानंतरही वेबसाईट सुरू होत नसल्याने महिलांनी विविध महासेवा ई सेवा केंद्र , अंगणवाडी केंद्र आणि स्थानिक परिसरातील नेत्यांच्या कार्यालयात महिला एकत्रित येऊन जमू लागल्या आहेत. त्यानंतर सामाजिक संस्थांकडून देखील योजेनची तयारी सुरू केली आहे.
महिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या कार्यालया समोर एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
सरकारने रहवासी आणि उत्पन्न दाखला रद्द केल्यानंतर महिलांमध्ये आनंद पसरला आहे. महिला मोठ्या प्रमाणावर आवश्यक कागदपत्रे घेऊन स्थानिक सामाजिक संस्थांच्या कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या. ऍप सुरू झाल्यानंतर लगेच गोळा केलेले अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे संस्थांकडून सांगण्यात आले आहे.