अक्कलकोट : कै पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आषाढी एकादशी निमित्त श्रद्धा, भक्ती आणि समतेचा संदेश देणारा पालखी रिंगण सोहळा व अभंग नृत्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अभंगाचा जयघोष करत याची देही याची डोळा, नयनम्य कार्यक्रम रिंगण सोहळा कार्यक्रम अनुभवण्याचे भाग्य लाभल्यामुळे प्रेक्षक पुरते सुखावून गेले.
सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय,
सेमी इंग्लिश व प्राथमिक मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा दर्शविणारा संस्कृतिक कार्यक्रम
आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज तसेच शेगावचे गजानन महाराज यांचा जयघोष करत टाळ मृदूंगाच्या तालात हरिनामाच्या गजरात तिन्ही पालख्या विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळ्यासाठी आणल्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापनाच्या सदस्या पूनम कोकळगी, रूपाली शहा यांनी विठोबा रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, दिगंबर जगताप, सिद्रामप्पा पाटील, खंडेराव घाटगे, सुर्यकात रूगे आदी उपस्थित होते.
त्यानंतर प्रांगणात रिंगण सोहळा शिस्त, सेवा सहकार्य आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून संपन्न झाला. रिंगण सोहळ्यामध्ये पारंपारिक पोषाखातील विद्यार्थी, महिला-पुरुष शिक्षक सहभागी झाले होते. अक्षरशः ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. पालख्यासमोर विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभंगाच्या तालावर प्रेक्षणीय नृत्य करून सोहळ्यास रंगत आणली. सर्व जाती धर्मांच्या पंथाच्या मुलांचे एकत्रित गोल रिंग पाहण्यासारखा होता.
रिंगण सोहळा कार्यक्रमाचे प्रस्ताविक निशिगंधा सोमेश्वर यांनी केले, सूत्रसंचलन कल्पना स्वामी व दिगंबर जगताप यांनी केले, सर्वांचे आभार आरती थोरात यांनी मानले.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी कौतुक केले.
चौकटीतील मजकूर
शिक्षक विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रिंगण सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण करणार नाही, प्लास्टिकचा वापर करणार नाही, स्वत: बरोबर परीसर देखील स्वच्छ ठेवीन अशी शपथ घेतली.
समानतेची शिकवण देणारी वारकरी परंपरा प्रेरणादायी
समाजात प्रेम, बंधुभाव, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी याची जाणीव निर्माण करण्यासाठी वारकरी परंपरा प्रेरणादायी आहे. समानतेने वागणे, व्यसनमुक्त जीवन जगणे आणि समाज हितासाठी कार्य करणे हीच विठुरायाची खरी भक्ती आहे असा संदेश संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी दिला.