अक्कलकोट – विद्यार्थ्यांनी दानशूर व शिक्षणमहर्षी कै. चनबसप्पा खेडगी यांच्या कार्याचा आदर्श घेऊन प्रामाणिकपणे कष्ट करावेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मराठी विभागप्रमुख डॉ. चौडप्पा आणेकर यांनी केले.
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात कै. चनबसप्पा खेडगी यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी होते.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी, समन्वयक डॉ. गणपतराव कलशेट्टी उपस्थित होते.
प्रास्ताविकात समन्वयक डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी चनबसप्पा खेडगी यांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक योगदानाचा आढावा घेतला. त्याग, सत्यनिष्ठा, कष्टाळूपणा आणि समाजाप्रतीची आत्मीयता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती, असे त्यांनी सांगितले.
डॉ. आणेकर पुढे म्हणाले, चनबसप्पा खेडगी यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. १९९२च्या भीषण पाणीटंचाईच्या काळात त्यांनी स्वतःचा ऑइल मिल व्यवसाय बंद ठेवून अक्कलकोट शहरातील नागरिकांना सुमारे सात टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला. नवरात्रोत्सवात अल्प दरात गोडेतेल वाटप, श्रीशैलम येथे साधुसंतांना वस्त्रदान, भाविकांना बुंदी लाडू वाटप तसेच धार्मिक व सामाजिक संस्थांना आर्थिक मदत, अशा विविध माध्यमांतून त्यांनी समाजसेवा केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक जाणीव आणि जबाबदारीही जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास वरिष्ठ, कनिष्ठ, बीसीए आणि व्यावसायिक शिक्षण विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. जी. एस. स्वामी यांनी केले. डॉ. ए. पी. सुरवसे यांनी आभार मानले.
*चौकट –*
दानशूर चनबसप्पा खेडगी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. ८ आॅक्टोंबर) सकाळी नऊ वाजता महाविद्यालयातील सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ऐच्छिक रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने केले आहे.
Post Views: 20