बार्शी – तालुक्यातील पुरी येथे १५ वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी मृत मुलीच्या आईने पांगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती आणि सांसऱ्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक छळ, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न आणि मानसिक त्रासामुळेच मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यातील पारधी समाजातील १५ वर्षीय मुलीचा विवाह १४ डिसेंबर २०२५ रोजी बार्शी तालुक्यातील एका गावातील मुलाशी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच तिचा सासरी मानसिक छळ सुरु झाला. यानंतर मुलगी माहेरी आल्यानंतर तिने आईसमोर आणखी गंभीर आरोप केले. २ जुलै २०२६ रोजी घरात कोणी नसताना सासऱ्याने तिच्या इच्छेविरुद्ध शरीराला स्पर्श करुन गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. हा प्रकार पतीला सांगितल्यानंतरही त्याने कोणालाही याबाबत सांगू नको, असे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
४ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त माहेरी आलेल्या मुलीला पुन्हा सासरी सोडताना आईने पती व सासऱ्यांना मुलीचा विनाकारण छळ करु नये, काही अडचण असल्यास स्वतःला सांगावे, अशी विनंती केली होती.
दरम्यान, १५ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मुलीने आईला फोन करुन, आदल्या रात्री सासऱ्याने पुन्हा घरात एकटी असताना तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच मुलीच्या पतीने फोन करुन तिने गळफास घेतल्याची माहिती दिली. याप्रकरणी मृत मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन पती आणि सासरे यांच्याविरुद्ध मानसिक छळ, लैंगिक गैरवर्तनाचे आरोप तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Views: 5